विमानाचा खोळंबा संपला
नांदेड येथील डीजीसीए यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वी नांदेड विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे आढळल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे पुणे-नांदेडसह दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांकडे जाणारी विमानसेवा थांबवण्यात आली होती.
मुख्य रनवेवरील अडचणी
नांदेडमधील गुरुगोविंद सिंगजी विमानतळ येथे मुख्य धावपट्टीवर सुमारे दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. या काळात अनेक प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली.
advertisement
विमानसेवा पुन्हा नियमित
आता विमानतळावरील सर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून विमानसेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान स्टार एअरकडून पुणे-नांदेड ही सेवा उडान योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली होती. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. आता नियमित उड्डाणांमुळे व्यवसायिक, शासकीय कामानिमित्त आणि धार्मिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
