आता अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. रविवारी एका घटस्फोटीत महिलेनं आणि २०२३ मध्ये ७ महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेनं अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर अशोक खरातचं हे अघोरी साम्राज्य उद्ध्वस्त कसं झालं. त्याचा पर्दाफाश कुणी केला? केबिनमध्ये कॅमेरे कसे लागले, याची माहिती समोर आली आहे.
advertisement
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा पर्दाफाश त्याच्या एकेकाळच्या अगदी जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तीने केला आहे. एकेदिवशी खरातने केलेला लंपटपणा त्याच्या अंगाशी आला आणि त्याचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त झालं.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, खरातचा पर्दाफाश करणारी व्यक्ती आणि खरात एकमेकांना चांगलं ओळखतात. संबंधित व्यक्ती खरातची निस्सीम भक्त होती. २०२३ मध्ये तो आपल्या गरोदर पत्नीला घेऊन खरातकडे आला होता. पत्नी ७ महिन्यांची गरोदर होती, त्यामुळे तिची प्रसूती सुरक्षित व्हावी. बाळ सुरक्षित राहावं, यासाठी तो खरातकडे घेऊन आला होता. यावेळी खरातने काही पूजा करायची असल्याचं सांगत या व्यक्तीला केबिनच्या बाहेर काढलं.
खरातच्या प्रभावाखाली असल्याने संबंधित व्यक्ती केबिनच्या बाहेर गेली. पण त्यानंतर खरातने केबिनमधील लाईट बंद करून आपल्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवर हात टाकला. अश्लील चाळे करायला सुरुवात केली. केबिनमधून बाहेर पडल्यानंतर महिलेनं घडलेला सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. सुरुवातीला त्याला यावर विश्वास बसला नाही. मात्र तिने आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेतली. तेव्हा संबंधित व्यक्तीला विश्वास बसला. इथूनच खरातच्या साम्राज्याला सुरुंग लागला.
ओळखीच्या व्यक्तीने आधी खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. त्याला संशय बळावल्यानंतर त्याने खरातच्या ऑफिसमध्ये छुपा कॅमेरा बसवला आणि त्याने केबिनमधील लैंगिक छळाचे अनेक व्हिडीओ शूट केले. यानंतर याच व्यक्तीने हे सर्व व्हिडीओ पेनड्राईव्हमध्ये घेऊन नाशिक पोलिसांकडे दिले. संबंधित व्हिडीओ पाहून पोलिसांना देखील धक्का बसला.
