गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह अहिल्यानगर आणि नवी मुंबई परिसरामध्ये अनेक बनावट कॉल सेंटर सुरू होते. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीप्रमाणे ते कॉल सेंटर ट्रान्सफर करून घेतले. इगतपुरीतील रिसॉर्टवर सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. बनावट कॉल सेंटरवर कोणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सीबीआयने आयपीएस अधिकार्यांना नोटीस बजावली आहे. सीबीआयने धाड टाकलेले सर्व कॉल सेंटर उद्ध्वस्त केलेले आहे.
advertisement
या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक परदेशी नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आलेली आहे. सीबीआयच्या टीमने या छाप्यात, 1 कोटी 20 लाखांची कॅश आणि अलिशान कार्स जप्त केलेल्या आहेत. सीबीआयकडून प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'प्रोटेक्शन मनी' देत हा रॅकेट चालवत जात असल्याचा संशय आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने डिसेंबरमध्ये नोटीस दिल्याची माहिती आहे. चौकशीसाठी हे अधिकारी दिल्लीमध्ये गेले असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती. सध्या पोलिसांकडून अनेक ठिकाणी धाड टाकून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, ठाणे, ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई, नाशिक, अहिल्यानगरसह इतरत्र जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही रॅकेट पसरली आहेत, त्या अधिकार्यांना चौकशीसाठी सीबीआय बोलवत आहे.
