advertisement

महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे घराच्या छतावर कोणीच लावत नाही कवेलू, काय आहे परंपरा?

Last Updated:

या गावाची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथील एकाही घराच्या छतावर कवेलू (कौल) लावलेले दिसत नाहीत. आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.

+
News18

News18

अमरावती : महाराष्ट्रातील देऊरवाडा हे गाव आपल्या अनोख्या परंपरेमुळे संपूर्ण राज्यात वेगळे स्थान निर्माण करत आहे. देवाचा वाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथील एकाही घराच्या छतावर कवेलू (कौल) लावलेले दिसत नाहीत. आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.
अरविंद भोंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी ग्रामीण भागात घरांच्या छतासाठी कवेलूंचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. मजबूत, टिकाऊ आणि पावसापासून संरक्षण देणारी ही पद्धत सर्वत्र प्रचलित होती. मात्र देऊरवाडा येथे ही परंपरा कधीच स्वीकारली गेली नाही. अगदी जुन्या काळात, जेव्हा बांधकामासाठी साधनसामग्री उपलब्ध नव्हती, तेव्हाही येथील लोकांनी गवत, काठ्या, माती यांचा वापर करून छते उभी केली, पण कवेलू लावण्याचे टाळले.
advertisement
या प्रथेच्या मुळाशी एक पौराणिक कथा आणि खोल धार्मिक श्रद्धा दडलेली आहे. गावात भगवान नृसिंह यांची स्वयंभू मूर्ती आहे. ज्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच गावातून वाहणारी पयोष्णी नदी हीही या कथेशी जोडली जाते.
पुराणानुसार, भगवान नृसिंह यांनी राक्षस हिरण्यकशिपुचा वध केल्यानंतर त्यांच्या नखांमध्ये प्रचंड उष्णता आणि दाह निर्माण झाला. हा दाह शांत करण्यासाठी ते पृथ्वीवर विविध ठिकाणी फिरले आणि अखेरीस पयोष्णी नदीच्या तीरावर आले. येथे करशुद्धी तीर्थ नावाच्या पवित्र स्थळी त्यांनी आपली नखे पाण्यात बुडवली. त्यामुळे त्यांच्या नखांचा दाह शांत झाला आणि त्यांना समाधान मिळाले. त्या घटनेनंतर त्यांनी याच ठिकाणी वास केल्याची श्रद्धा आहे. या गावात असलेली नृसिंह भगवान यांची मूर्ती ही दगडाची नसून वाळूची आहे.
advertisement
कवेलू न वापरण्यामागील कारण पुढीलप्रमाणे
पयोष्णी ग्रंथातून मिळालेल्या माहितीनुसार, कवेलूचा आकार हा नृसिंह भगवंतांच्या नखांसारखा दिसतो. त्यामुळे त्यांच्या नखांचा अपमान होऊ नये, या भावनेतून गावात कवेलू वापरणे टाळले जाते. ही फक्त परंपरा नसून श्रद्धेचा भाग बनली आहे. जेव्हा नृसिंह भगवंतांनी वध केला तेव्हा त्यांची नखे कवेलूसारखी वाढलेली होती, असेही नागरिक सांगतात.
advertisement
पूर्वी काही लोकांनी कवेलू वापरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना काही अडचणी, अपघात किंवा अनिष्ट घटना घडल्या, ज्याला त्यांनी दैवी संकेत मानले. त्यानंतर ही प्रथा अधिकच कटाक्षाने पाळली जाऊ लागली. काहींचे वंशच संपले, या सर्व बाबी नागरिकांनी स्वतः अनुभवल्या आहेत.
सर्वच धर्माचे लोक पाळतात ही परंपरा
या गावातील आणखी एक विशेष बाब म्हणजे येथे केवळ एका धर्माचे नव्हे, तर सर्व धर्मीय लोक नृसिंह भगवंतांवर श्रद्धा ठेवतात. गावातील प्रत्येक सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमात सर्वजण एकत्र सहभागी होतात. त्यामुळे ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्याचेही प्रतीक ठरते.
advertisement
आधुनिक काळातही परंपरेचे जतन
आजच्या आधुनिक युगात सिमेंटची घरे, आरसीसी बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत असली तरी देऊरवाडा गावात कवेलूंचा वापर अजूनही होत नाही. नवीन घरे बांधतानाही लोक ही परंपरा पाळतात आणि पर्यायी छतांची निवड करतात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे घराच्या छतावर कोणीच लावत नाही कवेलू, काय आहे परंपरा?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement