नेमकी घटना काय?
हनुमाननगर येथील रहिवासी ज्योती पंडितराव गीते यांना गोविंद नगरमधील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी अपॉइंटमेंट हवी होती. त्यांनी गुगलवर संबंधित रुग्णालयाचा संपर्क क्रमांक शोधला. काही वेळाने त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण त्याच रुग्णालयातून बोलत असल्याचे सांगून गीते यांचा विश्वास संपादन केला.
advertisement
टोकनच्या नावाखाली जाळं पसरलं
भामट्याने 'टोकन नोंदणी' करण्यासाठी एक लिंक पाठवली आणि त्यावर माहिती भरण्यास सांगितले. गीते यांनी लिंकवर माहिती भरताच, काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 39 हजार रुपये लंपास झाले. फसवणुकीचा हा सिलसिला इथेच थांबला नाही; दुसऱ्या एका तक्रारदारालाही अशाच पद्धतीने जाळ्यात ओढून त्यांच्या खात्यातून 88 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सायबर गुन्हेगारांची 'मोडस ऑपरेंडी' फेक नंबर्स
गुगल मॅप्स किंवा सर्च रिझल्टमध्ये भामटे स्वतःचे नंबर हॉस्पिटलच्या नावाखाली नोंदवतात. तुम्ही नंबर सर्च करताच किंवा तिथे दिलेल्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करताच हे भामटे समोरून कॉल करतात. टोकन किंवा रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली लिंक पाठवून बँक खात्याचा ताबा मिळवला जातो.
कोणत्याही अनोळखी लिंकवर आपली बँक खात्याची माहिती भरू नका. हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष गेल्याशिवाय किंवा अधिकृत काउंटरवर गेल्याशिवाय ऑनलाइन पैसे भरू नका. नागरिकांना आवाहन सायबर खात्याकडून करण्यात येत आहे.






