नाशिकच्या सातपूर परिसरातील व्यावसायिकाच्या स्कॅन्डल प्रकरणाला मोठं आणि धक्कादायक वळण लागलंय. या प्रकरणातील फिर्यादीवरच आता लैंगिक शोषण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र एरंडे असं आरोपीचं नाव असून, या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. यापूर्वी या प्रकरणात संबंधित व्यावसायिकाच्या आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करत १२ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. विशेष म्हणजे, हे संशयित संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयातच काम करत असल्याचे तपासात समोर आलं होतं.
advertisement
नोकरीचं आमिष देऊन अत्याचार
आरोपीचं रवींद्र गणपत एरंडे ( वय ६३) विरोधात पीडितेनं सातपूर पोलीस स्टेशन इथं संपर्क साधून तक्रार दिली आहे. एरंडेनं पीडित महिलेच्या मुलास सरकारी नोकरी लावून देतो तसंच पीडित महिलाचा गैरफायदा घेऊन पीडित महिलेला 'तुमचं भविष्य उज्ज्वल करून देतो' असं आमिष दाखवून तिच्यावर नाशिक तसंच इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलवर घेऊन जाऊन वारंवार लैंगिक शोषण केलं. आता खंडणी प्रकरणातील फिर्यादी संशयीत रविंद्र एकनाथ एरंडे याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र एरंडेलाा अटक करण्यात आली आहे.
हार्ड डिस्क गेली चोरीला अन् कांड उघड
प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हार्ड डिस्क चोरी झाल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान ही हार्ड डिस्क कार्यालयातीलच कर्मचाऱ्याने चोरल्याचं उघड झालं. चोरीनंतर हार्ड डिस्कमधील सुमारे १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून दोन पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या संशयितांनी नंतर ही रक्कम वाढवत १२ लाखांपर्यंत नेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
हार्ड डिस्कमध्ये १२१ व्हिडीओ
दरम्यान, जप्त हार्ड डिस्कमध्ये २००३ ते २०२४ या कालावधीत तयार करण्यात आलेले १२१ हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
संबंधित व्यावसायिक स्वतःला पत्रकार म्हणून सांगत असला तरी तो महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच तो पार्टटाइम ज्योतिषाचाही व्यवसाय करत असल्याचंही समोर आलं आहे. अंनिसने या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणात पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं असून, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पीडित महिलांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यावसायिकाविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता या नव्या सेक्स स्कॅन्डलमुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, सोशल मीडियावर “खरात पॅटर्न २” ची चर्चा जोर धरत आहे.
