परभणी महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. शिवसेना-काँग्रेसकडे बहुमत असल्याने दोन्ही पक्ष आघाडी करून सत्ता स्थापन करणार आहेत. त्या अनुषंगाने परभणीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख फोफडे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जेष्ठ नगरसेवक उपस्थित आहेत.
महापौर-उपमहापौरपदासाठी नावं ठरली!
advertisement
वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापौर म्हणून शिवसेना मुस्लिम चेहरा देणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. सय्यद शरफुद्दीन सिद्धिकी आणि सय्यद इक्बाल या दोघांपैकी एकाच्या नावावर चर्चा सुरू असून एकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडू शकतो, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. तर काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी गणेश देशमुख यांचे नाव निश्चित झाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेने मुस्लिम चेहरा का दिला?
परभणी महापालिका निवडणुकीत एकूण ३० मुस्लिम निवडून आले आहेत. ठाकरेंच्या २५ नगरसेवकांपैकी १३ मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. तर उर्वरित १२ हिंदू सदस्य आहेत. मुस्लिम नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने अल्पसंख्याक समुदायाला महापौर करण्याचे पक्षाचे ठरले असल्याचे कळते.
पक्षीय बलाबल काय?
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू होती. बरेच प्रयत्न करूनही संख्याबळ जुळत नसल्याने भाजपने सत्तास्थापनेच्या स्पर्धेतून माघार घेतली. परभणी महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ३४ नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेस आणि शिवसेनेकडे एकूण ३७ नगरसेवकांचे पाठबळ आहे.
काँग्रेस-सेनेला दादांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळणार?
शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या दाव्यानुसार, महापालिकेचा निकाल लागल्यावर अजित पवार यांनी त्यांना फोन केला होता. महापालिकेत सत्तास्थापनेवेळी राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल असेल, असे त्यांनी कळविले होते. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत दादांची राष्ट्रवादी सेना-काँग्रेसच्या मागे उभी राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
