पुणे महानगर पालिका निवडणूक भारतीय जनता पक्षातून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. धनंजय जाधव यांना प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वती मधून उमेदवारी मिळावी, यासाठी ते इच्छुक होते. परंतु पक्षाने उमेदवारीसाठी असमर्थता दर्शविल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला.
जागा वाटपानंतर भाजपमधून पहिली बंडखोरी
धनंजय जाधव यांच्या रुपाने पुण्यात भाजपमधून पहिली बंडखोरी झाली. जागा वाटपानंतर भाजपमधून होणारी बंडखोरी समोर आली. धनंजय जाधव यांनी अजित पवार यांची भेट घेतली. भाजपमधून तिकीट डावलल्याने धनंजय जाधव यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
advertisement
भाजपने उमेदवारी न दिल्याने धनंजय जाधव यांच्या डोळ्यात अश्रू
प्रबळ दावेदार असतानाही मला तिकीट दिले नाही. माझ्यावर अन्याय झाला आहे, ज्याला कुणी ओळखत नाही त्याला पक्षाने तिकीट दिले. भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत असेल तर गप्प बसणार नाही, असे धनंजय जाधव म्हणाले. आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचं ठरेना
सुरुवातीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करून अपेक्षित यश न आल्याने अजित पवार यांच्या नेत्यांनी चर्चा थांबवली. परंतु नंतर पुन्हा वरिष्ठ पातळीवरून निरोप आल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. निवडणूक अर्ज भरायला अगदी २४ तास राहिलेले असतानाही अजूनही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युती आघाड्यांच्या चर्चा पूर्ण होत नाहीयेत. पुढच्या चार ते पाच तासांत युती आघाडीचा निर्णय घेऊन सोमवारी रात्री संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली.
