एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी फोनवरून एकमेकांशी पुणे महानगरपालिकेसाठी युतीची चर्चा केली. पुणे भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने एकनाथ शिंदे यांनी
राष्ट्रवादीसोबत युतीची चाचपणी केली. साथीदाराच्या शोधात असलेल्या अजित पवार यांनीही लगोलग होकार दिल्याने स्थानिक नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर हे देखील अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील जिजाई बंगल्यावर पोहोचले.
advertisement
भाजपशी फिस्कटल्यानंतर शिवसेना अजितदादांच्या संपर्कात
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची पुण्यात युती होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत युती करत शिवसेना पुणे महानगरपालिका निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे.रवींद्र धंगेकर यांच्यासोबत सेनेचे इतर नेते देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देखील अजित पवार यांच्या सोबत जिजाई बंगल्यात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांना प्रस्ताव
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २५ ते ३० जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शिवसेनेला हवे असलेले प्रभाग पाहून, त्याविषयी चर्चा करून अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अशी युती होण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेचे भाजपवर दबावतंत्र
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला पुण्यात २५ ते ३० जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपने २५ जागा सोडण्यास नकार दिल्याने शिवसेना पदाधिकारी हिरमुसले. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात जोरदार वादही झाला. केवळ १५ जागा सोडण्यास भाजपने तयारी दर्शवली. त्यानंतर युती-आघाडीचा पर्याय म्हणून धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन भाजपवर एकप्रकारे दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे.
