रोहित पवार हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेत दाखल झाले होते. त्यावेळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत मागून अजित पवार येत होते. त्यांनी रोहित पवारांना पाहताच "झिपऱ्या बऱ्याच वाढल्या तुझ्या", अशी मिश्किल टिप्पणी केली होती. या टिप्पणीवर रोहित पवारांनीही त्यांच्याकडे मागे वळत हसून पाहिलं. काका-पुतण्याच्या नात्यातील गंमतशीर पैलू पाहायला मिळाला होता. तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा गंमतीशीर प्रसंग कधी अतिशय भावनिक प्रसंगात वळेल असे कधी कोणाच्या ध्यानी मनी देखील नव्हता.
advertisement
रोहित पवारांची 'हेअर स्टाईल' बदलली
राजकारणातील पेहराव आणि राहणीमान तसा अलिखित नियम. पण काही वेळा युवा राजकारणी त्याला काहीशी बगल देतात. रोहित पवार यांनीही बदल म्हणून नवी 'हेअर स्टाईल' केली. परंतु अजित पवार यांच्या बेरक्या आणि चाणाक्ष नजरेतून ती सुटेल कशी? रोहित पवार समोर येताच वाढलेल्या झिपऱ्या कापा... असे फर्मान त्यांनी सोडले. पण अजित पवार यांच्या निधनानानंतर काकांनी केलेली सूचना आठवून रोहित पवार यांनी भावनिक कृती करीत वाढलेल्या झिपऱ्या खरोखर कापून प्रिय व्यक्तींसाठी आवडती गोष्ट वर्ज्य करायची असते, हा नियम पाळला. काका पुतण्याच्या भावनिक नात्याचा खरोखर हा हळवा क्षण ठरला.
अजित पवारांची हसवत-हसवत टोला लगावणारी शैली कायम लक्षात राहणारी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून एक कणखर, जिद्दी नेता आपल्यात नाही यावर अनेकांचा अजूनही विश्वास बसत नाही, फक्त राजकीय कारकिर्दीमुळेच नाही तर आपल्या सरळ, तडफदार आणि मिश्किल भाषाशैलीमुळे ते नेहमीच आपल्या भाषणात विरोधकांना टोला लगावायचे. त्यांची भाषणे नेहमीच लोकांची मन जिंकून घ्यायची. सरळ शब्दांत सणसणीत संदेश देणारी त्यांची भाषणशैलीच त्यांची खरी ओळख ठरली. अजित पवार आज आपल्यात नसले तरी हसवत-हसवत टोला लगावणारी, पण ठाम संदेश देणारी त्यांची भाषा मात्र आपल्या नेहमीच स्मरणात राहील.
