शरद पवार यांना श्वसनास त्रास होत आहे. त्यांना प्रचंड प्रमाणात कफ झाला आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्यांना जास्त प्रमाणात खोकलाही आहे. नियमित औषधोपचार करूनही त्यांना बरे वाटले नाही. अखेर त्यांना आज रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. विशेष म्हणजे प्रकृती बरी नसल्याने त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमही टाळले. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. गेल्या आठवड्यातील तीन दिवस ते अजित पवार यांचे निवासस्थान असलेले सहयोग सोसायटीमध्ये होते. गत सप्ताहात प्रचंड दगदग झाल्याने त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर काय म्हणाले?
रूबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचे की घरी सोडायचे यावर निर्णय घेतला जाईल.
आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवले जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
गोविंदबागेत तासभर वैद्यकीय तपासणी
शरद पवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक सकाळपासूनच गोविंदबागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर तपासणी केल्यानंतर त्यांना पुण्याला उपचारासाठी जाण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या.
शरद पवार प्रचंड थकवा
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातून नेते पदाधिकारी बारामतीला येत आहेत. सहयोगला जाऊन दादांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन संबंधित सगळेच जण गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेण्याकरिता जात आहेत. जवळपास आठ दिवस हा दिनक्रम सुरू असल्याने शरद पवार यांना प्रचंड थकवा आल्याचे सांगण्यात येते.
