परिस्थितीशी झुंज देत फुलवला संसार
गिरोला येथील सोविंदा गणपत बोरकर (८०) आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई (६५) यांनी अत्यंत कष्टातून संसार उभा केला होता. लग्नापासूनच गरिबीचे चटके सोसत, एकमेकांचा हात हातात घेऊन त्यांनी आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना केला. उतारवयात मुलेबाळे असूनही हे दोघे वृद्ध एकमेकांसाठी सर्वात मोठा आधार होते. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होते.
advertisement
पतीच्या विरहाने खचल्या अंजनाबाई
१२ फेब्रुवारी रोजी सोविंदा बोरकर यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ज्या पतीसोबत आयुष्यभर सावलीसारखी सोबत केली, तो आधार अचानक हिरावला गेल्याने अंजनाबाई पार खचून गेल्या होत्या. पतीच्या निधनाचा धक्का त्यांच्यासाठी असह्य होता. घरात पतीच्या निधनामुळे सुतकाचे वातावरण होते आणि नातेवाईक सांत्वन करत होते.
अंत्यसंस्कारापूर्वीच पत्नीचा मृत्यू
१३ फेब्रुवारी रोजी सकाळी सोविंदा यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. संपूर्ण गाव त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमा झालं होतं. मात्र, पतीच्या विरहाचं दुःख अंजनाबाई पचवू शकल्या नाहीत. पतीचा देह समोर असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली. काही कळायच्या आतच त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.
गावात हळहळ, सोबतच झाले अंत्यसंस्कार
एकाच घरातून पती-पत्नीची एकापाठोपाठ अंत्ययात्रा निघाल्याने गिरोला ग्रामस्थांचे डोळे पाणावले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ निभावणाऱ्या या दांपत्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करावा लागल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती.
