राज्यात महानगर पालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशातच प्रत्येक पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावं अशी महायुतीतल्या प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेनं साताऱ्याच्या मेढा इथं मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना मंत्री शंभूराज देसाईंनी मित्रपक्ष भाजपला थेट इशाराच दिला आहे.
advertisement
दंड थोपटून भाजपला दिलं आव्हान
एकीकडे महायुतीत ही धुसफूस सुरू असतानाच पाचोऱ्यातल्या मेळाव्यात बोलताना शिवसेना आमदार किशोर पाटलांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नसल्याचा दावा केला. शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार म्हणत दंड थोपटून भाजपला आव्हान दिलं आहे.
सत्ताधारी मात्र सारवासारव करण्याच्या भूमिकेत
विशेष म्हणजे किशोर पाटलांना भाजपकडून त्रास झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनीही म्हटलं आहे. महायुतीतल्या या धुसफुशीवर टीकेचे बाण सोडण्याची संधी विरोधकांनी साधून घेतली आहे. तर सत्ताधारी मात्र सारवासारव करण्याच्या भूमिकेत दिसून आले.
मतभेद दूर करण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून बोललं जातं. मुंबईसह ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत आतापासून रस्खीखेच सुरू झाली आहे. अशातच या निवडणुकीपूर्वी शिवसेना नेत्यांनी खदखद व्यक्त करत भाजपला थेट आव्हान दिलंय. आता हे मतभेद दूर करण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे.
