नेमकं प्रकरण काय आहे?
शिवाजी नगर गोवंडी परिसरातील 'शफा' नावाच्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण प्रेमाच्या त्रिकोणातून घडल्याचं समोर आलं होतं. या हत्येनंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवत आधी ४ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, आरोपींच्या कसून चौकशीनंतर या गुन्ह्यात इतर ५ जणांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. आता या पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्यही जप्त केलं आहे. यात २ रिव्हॉल्वरचा देखील समावेश आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या काही गाड्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शफाचा खून केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावून मुंबईबाहेर फरार होण्याचा आरोपींचा मोठा प्लॅन होता. पोलिसांना संशय येऊ नये आणि पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होऊ नये, यासाठी त्यांनी सर्व तयारी केली होती. मात्र, शिवाजी नगर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आरोपींचा हा डाव पूर्णपणे उधळून लावला.
तरुणीची हत्या का करण्यात आली?
मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली होती. 19 वर्षीय शिफा शेख हिची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात लव्ह ट्रँगलमधून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. शिफा ही कमला रमण नगर येथे कुटुंबासोबत राहत होती. ती नादिम नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंधात होती, तसेच नादिमचे दुसऱ्या एका तरुणीशीही संबंध होते.
घटनेच्या दिवशी शिफा नाश्त्यासाठी घराबाहेर पडली असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर गोळीबार केला. तिच्या मानेवर आणि गालावर गोळ्या लागल्या होत्या. स्थानिकांनी तिला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आता या प्रकरणात नऊ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
