आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी बैठकीत आपली व्यथा मांडताना स्पष्ट केले की, महायुतीतील मित्रपक्षांकडून युतीधर्म पाळला जात नाहीये. उलट, येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांना महायुतीतील सहकारी पक्षांत प्रवेश दिला जात आहे. 'मतदार संघात आम्हाला संपवण्याचं काम सुरू आहे,' अशी कैफीयत पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडली. विशेष म्हणजे, नंदूरबारमधील एका शिवसेना आमदाराने तर शिवसेनेच्याच माजी जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केले. ते भाजपसाठी काम करत असल्याचं सांगत, पक्षात असलेल्या 'झारीतील शुक्राचार्यां'कडे नेत्यांचे लक्ष वेधले.
advertisement
मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मोठे मतभेद असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या महत्त्वाच्या नगरपालिकांमध्येही शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रम कायम आहे. दोन्ही पक्षांनी खबरदारी म्हणून स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ठाण्यात संजय केळकर आणि नवी मुंबईतून गणेश नाईक यांसारख्या भाजप नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत वक्तव्ये होत असल्याने शिवसेनेकडूनही 'स्वबळा'ची तयारी सुरू करण्यात आली आहे.
महायुतीतील या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाढत्या मतभेदाचा थेट फटका महायुतीला बसू शकतो, तर विरोधकांना काही ठिकाणी नक्कीच फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तिढा तीनही पक्षांतील प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याशिवाय सुटणार नाही. समन्वयासाठी नेमलेल्या नेत्यांच्या बैठकांमधूनही कुठलाही तोडगा निघणार नाही, जोपर्यंत वरिष्ठ नेते यात लक्ष घालणार नाहीत. लवकरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या बैठका होणार आहेत, मात्र त्या विभागांतील जिल्ह्यांमध्येही परिस्थिती काही वेगळी नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे मतभेद मिटवताना तीनही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.