या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेप्रकरणी अद्याप कुणीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
या संपूर्ण घटनेची माहिती देताना बन्सल म्हणाले की, हा वली मोहम्मद दर्गा आणि आजुबाजुचा परिसर आहे. सोमवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या पोलिसांना माहिती मिळाली की, या परिसरात काही लोक जमले आहेत. दोन गटात भांडण सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच इथं पोलीस गाडी दाखल झाली. यावेळी घटनास्थळी दगडफेक होताना दिसली. तसेच आजुबाजुच्या गल्ल्यांमध्ये लोक जमलेले होते.
advertisement
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घटनास्थळावरील पोलिसांनी अधिक कुमक मागवली. त्यानंतर समाजकंठ घटनास्थळावरून पळून गेले. अद्याप या घटनेत जखमी झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र घटनास्थळी काही प्रमाणत दगडफेक झाल्याचं दिसत आहे. तसेच एक दोन गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत. या प्रकरणी पोलीस स्वत:हून एफआयआर दाखल करणार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जाणार आहे. घटनास्थळी गोळीबार झाल्याची कसलीही माहिती समोर आली नाही. यात कुणी जखमी झालेलं, मुका मार लागलेला किंवा दगड लागलेला कुणीही समोर आला नाही. असं काही समोर आलं तर पुढील कारवाई करू. सध्या परिसरात शांतता आहे, कसलाही तणाव नाही, अशी माहिती एसपी बन्सल यांनी दिली.