दरम्यानच्या काळात तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात काही बदल झाल्याचं सांगितलं होतं. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांएवढेच अधिकार कार्याध्यक्षांना (प्रफुल्ल पटेल) आहेत, असा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला होता. मात्र सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. २८ जानेवारी ते १० मार्च मधील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.
advertisement
मात्र मागील दोन दिवसांपासून हे पत्र सुनेत्रा पवार मागे घेणार असल्याचं बोललं जात होतं. पार्थ पवारांची खासदारकी टिकवण्यासाठी हे पत्र मागे घेणार असल्याची चर्चा होती. मात्र पवारांकडून हे पत्र मागे घेतलं जाणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांनी ‘ In this regard ‘ असा उल्लेख केला आहे. याचा अर्थ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन ( National Convention) संदर्भातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असा अर्थ होतो.
तसेच पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे. निवडणूक आयोगासोबत नाही. त्यामुळे त्यांच्या खासदारकीत कोणती अडचण येणार नसल्याचं पक्षाच्या वर्तुळातून सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्याने याबाबतची माहिती दिली आहे. पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीत अडचण येणार असल्याने ते पत्र मागे घेतलं जाणार होतं, अशा आशयाच्या बातम्या सुरू असल्याने पक्षाच्या नेत्याने हे स्पष्टीकरण दिलं आहे.
