खरात याच्यासोबतचे शिंदे-चाकणकर-केसरकर यांचे कॉल रेकॉर्ड एआय अॅपवरून मिळाल्याचा दावा अंधारे यांनी केला. त्यानंतर सर्वपक्षीयांनी दमानियांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आक्षेप नोंदवला. आज पत्रकार परिषद घेऊन दमानिया यांनी सर्वपक्षीयांचे आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी अंधारे यांनी पुन्हा शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.
हा गोपनीयतेचा भंग नाही का?
advertisement
अंधारे म्हणाल्या, दमानिया म्हणतात की अशोक खरात याला चाकणकर यांनी 177 कॉल केले. चाकणकर यांच्या बहिणीने खरातला 236 कॉल केले. एकनाथ शिंदे यांनीही १६ फोन केले. दीपक केसरकर हे देखील खरातच्या संपर्कात होते. मला एवढंच विचारायचे आहे की हे सगळे कॉल रेकॉर्ड दमानिया यांना कुठून मिळाले, हा गोपनीयतेचा भंग नाही का? असे सांगत सुषमा अंधारे यांनी 'ब्रीच ऑफ प्रायव्हसी'चा गंभीर मुद्दा उपस्थित केला. तसेच खरात याच्यासोबत बोलणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्याचे धारिष्ट्य विशेष पोलीस पथक दाखवणार का? असा सवालही अंधारे यांनी विचारला.
नाशिकच्या 'त्या' पोलिसांच्या भूमिकेवर संशय
खरात प्रकरणात नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल आम्ही एसआयटीला माहिती कळवले होती. परंतु चौकशीच्या अनुषंगाने कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली दिसत नाही. खरात याची पत्नी कल्पना खरात, मुलगी सृष्टी, मुलगा गायब झाला आहे. खरातची चौकशी सुरू असताना त्याचे कुटुंब गायब होणे, हे खूप भयानक आहे, हे न पटणारे आहे, असेही अंधारे म्हणाले.
चाकणकर यांची चौकशी का होत नाही?
एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीसाठी बोलावत नाही. चाकणकर एसआयटीला बोटांवर नाचवत आहेत का? तपास पुढे जात नाहीये. CDR बाहेरचा कोणी तरी व्यक्ती काढतो. मला तर वाटते दमानिया यांनाच एसआयटीचे प्रमुख करा, असा टोला अंधारे यांनी लगावला.
फडणवीसांच्या फोटोवर फुल्या कुणी मारल्या? केसरकर यांच्यावरही हल्लाबोल
काही लोक दबक्या आवाजात बोलत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील फुल्या मारल्या गेल्या आहेत. फुल्या मारण्याचे प्रकरण काय आहे, याची आम्हाला कल्पना नाही. अशोक खरातच्या हातून कोणी अघोरी विद्या करू पाहत आहे का? तो नक्की कोण आहे? असे सवालही अंधारे यांनी विचारले. खरात प्रकरणात दीपक केसरकर अनेक कड्यांमध्ये एक महत्त्वाची कडी आहे. दीपक केसरकर यातून पळ काढू शकत नाही. दीपक लोंढे हा आर्थिक व्यवहार सांभाळत होता आणि तो केसरकर आणि खरातसोबत होता, असेही अंधारे म्हणाल्या.
