कोल्हापूर: राज्यभरात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांनी देव अक्षरश: पाण्यात ठेवले आहे. काही ठिकाणी उमेदवारांना तिकीट मिळत आहे तर काही ठिकाणी नाकारलं जात आहे. अशातच कोल्हापूर भाजपमध्ये निष्ठावंत भाजप महिला इच्छुक उमेदवाराने तिकीट न दिल्यामुळे थेट आत्मदहनाचा इशाराच पक्षाला दिला आहे.
भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने तोडकर यांनी निर्णयच जाहीर केला आहे. धनश्री तोडकर यांनी पक्षाला एक पत्र लिहून मंगळवारी भाजपाच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं जाहीर करून टाकलं असून आज माझी आर्थिक परिस्थिती नसल्याच्या कारणामुळे पक्षाने तिकीट नाकारल्याचा आरोपही केला आहे.
advertisement
धनश्री तोडकर यांनी पत्रात काय लिहिलं?
नमस्कार,
मी धनश्री सचिन तोडकर, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर, मी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे करत आहे, काही महिन्यापूर्वी माझे पती कै. सचिन तोडकर यांचे निधन झालं. त्यांच्या निधनानंतर स्वतःला सावरून मी पक्षाचं काम अखंडित ठेवलं. पक्षाचा एकही कार्यक्रम किंवा एकही बैठक चुकवली नाही. कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा मोठे कार्यक्रम मी एकटी महिला असून घेतलं.
पण आज माझी आर्थिक परिस्थिती नाही, या कारणामुळे पक्ष मला तिकीट नाकारत आहे. मी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असल्याने पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्याने माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने मी उद्या मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.
आपली,
धनश्री सचिन तोडकर
सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी,
