माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय निवडणुक आयोगाकडून बारामती विधानभेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी आज मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उपस्थित होते. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या आवाहनाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
काँग्रेसच्या उमेदवाराला नाही तर सुनेत्रा पवारांना पाठिंबा
advertisement
सुनेत्रा पवार यांच्या फोननंतर बारामती पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पाठिंबा देण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांची दिली.
काँग्रेस पक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जर उमेदवार देत असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांची दिली. सुनेत्रा पवार यांच्या पाठिंब्याच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे स्वत: पत्रकार परिषद घेऊन अधिकृत या निर्णय जाहीर करतील, असे कळते.
सुनेत्रा पवारांना पाठिंब्यावर संजय राऊत काय म्हणाले?
अजित पवार हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी होते. तसेच दोघांमध्ये भावनिक नाते होते. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय स्वत: उद्धव ठाकरे घेतील, त्याबाबत तुमच्याशी स्वतः बोलतील. सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत नाही. तो भाजपबरोबर आहे. काँग्रेस जर वेगळा निर्णय घेणार असेल तर त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून लक्ष घातले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपाबरोबर असलेल्या पक्षाला मदत होऊ नये म्हणून काँग्रेस उमेदवारी देण्याच्या विचारात असेल. पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. बिनविरोध निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांनी काँग्रेसबरोबर चर्चा केली का, हे मला माहिती नाही, असेही राऊत म्हणाले.
