२१ आरोपींविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी वनराज आंदेकर खून प्रकरणात तब्बल १७०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जावई जयंत कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर, आणि कुख्यात टोळीप्रमुख सोमनाथ गायकवाड यांच्यासह एकूण २१ जणांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयासमोर पुराव्यांची सविस्तर मांडणी केली.
advertisement
सरकारी वकिलांनी घटनेवेळचे आणि आरोपी फरार होतानाचे CCTV फुटेज, ३९ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) आणि आवाजाचे नमुने, जप्त केलेली ८ पिस्तुले, ७ कोयते आणि १३ जिवंत काडतुसे असे भक्कम पुरावे कोर्टात सादर केले.
वनराज आंदेकरची हत्या का झाली?
सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार, या हत्येमागे तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे कौटुंबिक वाद. वनराज आंदेकर आणि त्यांची बहीण संजीवनी तसेच जावई कोमकर यांच्यात प्रदीर्घ काळापासून संपत्तीवरून वाद सुरू होते. दुसरं कारण म्हणजे अतिक्रमण कारवाईचा राग. वनराजची हत्या होण्याच्या काही दिवस आधी पुणे महापालिकेने संजीवनी कोमकर यांच्या नाना पेठेतील दुकानावर अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. त्यांचं दुकान पाडण्यात आलं होतं. ही कारवाई वनराज यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा संशय आरोपींना होता. तिसरं कारण म्हणजे निखील आखाडे खून प्रकरण. निखील आखाडे हा सोमनाथ गायकवाड टोळीचा सदस्य होता. त्याची हत्या केल्याचा आरोप आंदेकर टोळीवर होता. या प्रकरणी बंडू आंदेकरसह अन्य साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र नंतर वनराज आंदेकर यांच्या राजकीय वजनामुळेच आंदेकर टोळीतील आरोपींना जामीन मिळाला होता. याचा राग सोम्या गायकवाडला होता.
याच तीन कारणातून गायकवाड आणि कोमकर टोळी एकत्र आली. दोन्ही टोळ्यांनी मिळून वनराजची हत्या करण्याचं ठरवलं. घटनेच्या दिवशी १ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपींनी नाना पेठेतील वीज पुरवठा मुद्दाम खंडित केला होता. त्यानंतर आरोपींनी वनराज यांच्यावर पाळत ठेवून आधी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा निर्घृण खून केला. यापूर्वीही दोन वेळा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी आणि बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्यामुळे आरोपनिश्चितीची उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीच्या तारखेला पार पडणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होईल.
