कागदपत्रांची सखोल तपासणी करा
रिसेल फ्लॅट खरेदी करताना सर्वात आधी मालकी हक्काची कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे. विक्रेत्याच्या नावावर वैध सेल डीड (Sale Deed) आहे का? तो एकमेव मालक आहे की सहमालक आहेत, याची खात्री करा. सोसायटीचा शेअर सर्टिफिकेट, इंडेक्स-२, मालमत्ता कराची पावती, वीज-पाणी बिलांची थकबाकी नाही याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास वकील किंवा कायदेशीर तज्ज्ञांकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.
advertisement
सोसायटीची स्थिती जाणून घ्या
फक्त फ्लॅट नव्हे, तर संपूर्ण सोसायटीची स्थिती तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सोसायटी नोंदणीकृत आहे का, पुनर्विकासाबाबत काही प्रस्ताव आहे का, देखभाल शुल्क किती आहे, सोसायटीवर कर्ज किंवा कायदेशीर वाद तर नाहीत ना, याची माहिती घ्या. व्यवस्थापन कमिटीशी थेट संवाद साधल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होतात.
आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा
रिसेल फ्लॅट व्यवहारात रोख व्यवहार टाळावेत. सर्व रक्कम बँकिंग मार्गाने देणे सुरक्षित ठरते. अॅग्रीमेंट टू सेल, नोंदणीकृत खरेदीखत आणि स्टॅम्प ड्युटी योग्य रितीने भरली जात आहे का, याकडे लक्ष द्या. कर्ज काढत असाल तर बँकेकडून होणारी कायदेशीर तपासणीही अतिरिक्त सुरक्षितता देते.
ताबा आणि अटी स्पष्ट ठेवा
फ्लॅटचा प्रत्यक्ष ताबा केव्हा मिळणार, आतमध्ये कोणती फिटिंग्ज, फर्निचर किंवा उपकरणे मिळणार आहेत, पार्किंगचा हक्क आहे का, हे सर्व मुद्दे करारनाम्यात स्पष्टपणे नमूद असावेत. तोंडी आश्वासनांवर विसंबून राहणे धोकादायक ठरू शकते.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर रिसेल फ्लॅट व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर तात्काळ कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. सर्वप्रथम संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. त्यानंतर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. तसेच महाराष्ट्रात घरखरेदीदारांच्या तक्रारींसाठी महारेरा (RERA) कडेही दाद मागता येते. रेराकडे ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध असून, वेळेत न्याय मिळण्याची शक्यता अधिक असते.
