मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरंतर मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक शासकीय कार्यालयामध्ये राष्ट्र पुरुषांच्या आणि देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींचे फोटो लावले जात असतात. पण, उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
गट नेते निलेश आहेर सोबत शिवसेनेच्या नगरसेवकांनी फोटोवर आक्षेप घेत आयुक्तांच्या कार्यालयात येऊन निषेध केला. तातडीने फोटो काढण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
टिपू सुलतानचा फोटो योग्यच - उपमहापौर
आम्ही जेव्हा पदभार स्वीकारला. त्यावेळी आमच्या नगरसेवकांनी मला टिपू सुलतानचा फोटो भेट दिला होता. त्या नगरसेवकांनी माझ्या दालनात हा फोटो लावला. आता या फोटोवर माझाही काही आक्षेप नाही. टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी आहे. माझ्या दालनामध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यानंतर फोटो बदलला जाईल. पण, आमच्या विचारधारेनुसार, हा फोटो पुन्हा लावणार आहोत. या फोटोवरून इतका वाद का होत आहे, ते कळत नाही. काही लोकांनी मुंबई कोर्टातमध्ये धाव घेतली होती. टिपू सुलतान यांची जयंती साजरी करू दिली नव्हती. त्यावेळी सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं होतं. टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांना विरोध करू शकत नाही, असं म्हटलं आहे. मग हे विरोध करणारे कोण आहे? असा सवालच उपमहापौर शान ए हिंद यांनी उपस्थित केला.
तसंच, "टिपू सुलतान फ्रीडम फायटर होते. भाजपचे एक खासदार यांनी देखील मान्य केलं होतं की, टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. कर्नाटकचे ते खासदार होते. असं सांगितलं आहे तर हे विरोध करणारे कोण आहेत? एका महिला ओबीसी उपमहापौराला विरोध केला जात आहे. माझे वडील हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते. त्यांनी माझं नाव शान ए हिंद ठेवलं आहे. त्यांनी आपल्या मुलांची नावं भारत अशी ठेवली, माझ्यासोबत असं घडतं असेल तर हे चुकीचं आहे, अशा शब्दांत उपमहापौर शान ए हिंद यांनी नाराजी व्यक्त केली.
