मार्चच्या या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात सण-उत्सवांमुळे बँकांना सलग सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये गुढीपाडवा, ईद आणि रामनवमीमुळे बँका बंद राहणार आहेत.
राज्यानुसार कधी कुठे सुट्टी?
बँकेच्या सुट्ट्या या सर्व राज्यांमध्ये सारख्या नसतात. स्थानिक सणांनुसार रिझर्व्ह बँक (RBI) सुट्ट्या जाहीर करते. त्यानुसार सगळीकडेच बँका चार दिवस बंद राहणार नाहीत तर प्रत्येक राज्यानुसार याचं वेळापत्रक वेगवेगळं असेल. त्यामुळे तुम्हीही एकदा बँक शाखेत जाऊन बँक किती दिवस बंद राहणार याची माहिती घेतलेली केव्हाही चांगली. या कालावधीमध्ये ऑनलाइन बँकिंग सुरू राहणार आहे.
advertisement
गुढीपाडवा
हिंदू नववर्षाचे स्वागत करणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात बँका बंद राहतील. तसेच तेलगू नववर्ष (उगादी) मुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि राजस्थानमध्येही १९ मार्चला बँकांचे कामकाज होणार नाही. महाराष्ट्रातील नागरिकांनी आपले आर्थिक व्यवहार १८ मार्चपर्यंतच उरकून घेतलेले बरे.
ईद-उल-फित्र
रमजान ईदच्या निमित्ताने २० मार्चला जम्मू-काश्मीर, केरळ आणि आंध्र प्रदेशात बँका बंद राहतील. तर २१ मार्चला महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक राज्यांमध्ये ईदची सार्वजनिक सुट्टी असेल. २१ तारखेला शनिवार असल्याने आणि त्यानंतर २२ तारखेला रविवार असल्याने बँका सलग दोन ते तीन दिवस बंद राहू शकतात.
श्री रामनवमी
२६ मार्च रोजी रामनवमीनिमित्त महाराष्ट्र, मुंबई, नागपूर, कर्नाटक आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत बँका बंद राहातील. काही राज्यांत चैत्र दशमीनिमित्त २७ मार्चलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महावीर जयंती
महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्चला महावीर जयंती आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील बँका बंद राहतील. विशेष म्हणजे ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँकांसाठी हा दिवस तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो, तरीही सार्वजनिक सुट्टीमुळे सामान्य ग्राहकांसाठी बँका बंद असतील.
चौथा शनिवार आणि रविवार सुट्टी
सणांच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त २२ मार्चला रविवार आणि २८ मार्चला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या दहा दिवसांत बँकांचे कामकाज केवळ तीन ते चार दिवसच सुरळीत चालण्याची शक्यता आहे.
