आज, सोमवार, १० नोव्हेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या किमती एक टक्क्यांहून अधिक आणि चांदीच्या दोन टक्क्यांनी वाढल्या. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक भावना आणि पुढील महिन्यात यूएस फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदर कपात होण्याची वाढती अपेक्षा यामुळे ही वाढ झाली. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास MCX गोल्ड डिसेंबर फ्युचर्स १.०४ टक्क्यांनी वाढून १,२२,३३० रुपयांवर प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. त्याच वेळी, MCX सिल्व्हर डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट्स १.७६ टक्क्यांनी वाढून १,५०,३२५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होते.
advertisement
सोने आणि चांदीच्या दरात वाढ का?
ऑक्टोबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली. मात्र, अमेरिकन अर्थव्यवस्थेत बाबतच्या वाढत्या चिंता आणि डिसेंबरमध्ये यूएस फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदर कपात होण्याची वाढती अपेक्षा यामुळे सोन्याच्या दरात काही प्रमाणात तेजी आली आहे.
अमेरिकेतील सरकारी शटडाऊन रविवारी ४० व्या दिवशी सुरुच राहिले. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन असल्याने अमेरिकेतील रोजगार बाजार आणि ग्राहकांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या कमकुवत झाला आहे, असे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते.
मेहता इक्विटीजचे राहुल कलंत्री यांनी नमूद केले की, विक्रमी काळ चाललेल्या अमेरिकन सरकारी शटडाऊनमुळे मॅक्रो इकॉनॉमिक संभाव्यतेबद्दल चिंता वाढली आहे, गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे सोने आणि चांदींच्या दरात वाढ होऊ लागली आहे.
‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेत ऑक्टोबरमध्ये सरकारी आणि किरकोळ क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर कंपन्यांनी खर्च कमी केल्याने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्वीकारल्यामुळे नोकर कपात करण्यात आली. अमेरिकन सरकारच्या शटडाऊनच्या आर्थिक परिणामांबद्दल वाढत्या चिंतेमुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला बाजारात त्याची प्रतिकूल पडसाद उमटले. रोजगार बाजारातील ट्रेंडवरून असे दिसून येते की यूएस फेडरल रिझर्व्ह डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर कमी करू शकते. सीएमई फेडवॉच टूलनुसार, डिसेंबरमध्ये व्यापाऱ्यांना फेड दर कपातीची ६७ टक्के शक्यता दिसते.
अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल वाढत्या चिंतेमुळे सोन्याच्या किमती १ टक्क्यांहून अधिक वाढल्या, असे रिलायन्स सिक्युरिटीजचे जिगर त्रिवेदी म्हणाले. त्यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये एमसीएक्स सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२२,७०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे त्याला १२२,००० रुपयांचा आधार मिळेल असे त्यांनी नमूद केले.
