38% पर्यंत घसरण शक्य?
'मनी कंट्रोल'नं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन फाइनान्शिअल सर्व्हिसेस फर्म मॉर्निंग स्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याची किंमत 1,820 अमेरिकन डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येऊ शकते. सध्याच्या 3,080 डॉलर प्रति औंसच्या तुलनेत ही मोठी घसरण ठरेल. जर ही शक्यता खरी ठरली, तर भारतातही सोन्याचे दर 55,496 रुपया प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतात.
advertisement
सोन्याच्या वाढत्या दरामागची कारणे
गेल्या काही महिन्यांत जागतिक अस्थिरता, महागाई आणि अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या. मात्र, हे दर किती काळ टिकतील, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
सोन्याच्या दरात मोठ्या घसरणीची शक्यता का?
जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमतीत संभाव्य घसरणीची काही ठोस कारणे दिली आहेत:
पुरवठा वाढत आहे: सोने महाग झाल्यास खाणकाम अधिक वाढते. 2024 मध्ये जगभरात सोन्याच्या उत्पादनात 9% वाढ झाली. ऑस्ट्रेलियासह अनेक देश उत्पादन वाढवत आहेत आणि जुन्या सोन्याचे मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर होत आहे.
मागणी घटण्याचे संकेत: 2024 मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी 1,045 टन सोने खरेदी केले. मात्र, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेनुसार, 71% सेंट्रल बँकर्स पुढील वर्षी सोने खरेदी कमी करू शकतात.
इतिहास सांगतो, वाढलेले सौदे घसरणीचे लक्षण: 2024 मध्ये सोन्याच्या उद्योगातील व्यवहार 32% वाढले आहेत. भूतकाळात असे व्यवहार वाढले की त्यानंतर सोन्याच्या किमती घसरल्याचे आढळले आहे.
काही विश्लेषकांचा वेगळा अंदाज
'मनी कंट्रोल'नं दिलेल्या माहितीनुसार, मात्र, सर्व तज्ज्ञ जॉन मिल्स यांच्याशी सहमत नाहीत. वॉल स्ट्रीटवरील काही मोठ्या फर्म्सच्या मते, सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. बँक ऑफ अमेरिका पुढील दोन वर्षांत सोन्याचा दर 3,500 डॉलर प्रति औंसपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करत आहे. तसेच, गोल्डमॅन सॅक्सच्या मते, 2025 च्या अखेरीस सोन्याचा दर 3,300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
सोन्याचे दर वाढणार की कमी होणार?
सध्या सोन्याच्या किमती उच्चांकावर आहेत, पण तज्ज्ञांच्या मतभेदांमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. सोन्याच्या किमती 38% नी खाली जातील, की आणखी उच्चांक गाठतील, हे येत्या काळात स्पष्ट होईल.