गृह कर्ज आणि कन्स्ट्रक्शन लोन अर्थात बांधकाम कर्जात काय फरक आहे?
या दोन्हीची प्रक्रिया पूर्णतः वेगळी असते. कन्स्ट्रक्शन लोनची प्रक्रिया तयार फ्लॅट खरेदी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गृहकर्जापेक्षा पूर्ण वेगळी असते. यात मिळणारी रक्कम आणि नियम, अटींमध्ये बराच फरक असतो. इतकंच नाही, तर व्याजदर, बँकाकडून पेमेंट आणि ईएमआय भरण्याच्या पद्धतीतदेखील फरक असतो. घर बांधण्यासाठी कर्ज कसं मिळतं ते जाणून घेऊ या.
advertisement
सर्वप्रथम कागदपत्रं जमा करा :
कन्स्ट्रक्शन होम लोनसाठी काही खास कागदपत्रं गरजेची असतात. त्यासाठी ज्या जमिनीवर तुम्ही घर बांधणार आहात ती तुमच्या नावावर आहे, हे सर्वप्रथम सिद्ध करावं लागतं. याचाच अर्थ जमिनीची सर्व कागदपत्रं बँकेला दाखवावी लागतात. जर तुम्ही नुकतीच जमीन खरेदी केली असेल तर तिच्या खरेदीखताची कागदपत्रं पुरेशी ठरतात; पण जर जमीन वडिलोपार्जित असेल तर तुम्हाला इनकमब्रेंस प्रमाणपत्र द्यावे लागेल. हे प्रमाणपत्र तुमच्या जमिनीवर कोणताही बोजा किंवा वाद नसल्याचा पुरावा असतो. फ्री होल्ड प्लॉटवर लोन सहज मिळतं; पण लीजच्या बाबतीत तुमच्याकडे दीर्घकालीन लीज असणं गरजेचं आहे. जमिनीच्या कागदपत्रांसोबत केवायसी आणि उत्पन्नाचे पुरावे बँकेला द्यावे लागतात. तसंच घराचा आराखडा आणि लेआउटसुद्धा बँकेला द्यावा लागतो. तुमच्या नियोजित घराचा लेआउट स्थानिक संस्था, प्राधिकरण किंवा ग्रामपंचायतीनं मंजूर केलेला असावा. घर बांधण्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज आर्किटेक्ट इंजिनीअरने प्रमाणित केलेला असावा. या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर बँक लोनची प्रक्रिया सुरू करते.
हप्त्याने मिळतात पैसे :
जर तुमची सर्व कागदपत्रं योग्य असतील आणि बँकेनं प्लॉटची तपासणी केली असेल तर तुमचं लोन मंजूर होतं; पण कन्स्ट्रक्शन लोनप्रकरणात तुम्हाला सर्व पैसे एकाच वेळी दिलं जात नाहीत. जसजसं बांधकाम पूर्ण होईल तसे पैसे बँक तुम्हाला देत जाते.
बांधकाम सुरू झाल्यावर मिळू लागतात पैसे :
अशा प्रकारचं लोन घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे जोपर्यंत तुमच्या जमिनीवर घराचं बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत बँक तुम्हाला एक रुपयासुद्धा देत नाही. एकदा बांधकाम सुरू झालं की बँक आपला कर्मचारी तुमच्या साइटवर पाठवून बांधकामाची खात्री करतो. यासोबतच घराच्या बांधकामाचा फोटो आणि बांधकामाच्या अंदाजित कालावधीबाबत इंजिनीअर किवा आर्किटेक्टचं प्रमाणपत्र बँकेत जमा करावं लागतं. तुमची छायाचित्रे पडताळण्यासाठी बँक तांत्रिक कर्मचारी पाठवते आणि त्याच्या तपासणीनंतरच कर्जाची रक्कम मिळते.
व्याज आणि कालावधी किती असेल?
कन्स्ट्रक्शन लोनसाठी साधारण गृहकर्जाइतका कालावधी मिळतो. शासकीय एनबीएफसी एलआयसी होम फायनान्स सध्या 9.10 टक्के व्याजदराने 30 वर्षांसाठी कन्स्ट्रक्शन लोन देते. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकदेखील 9 टक्क्यांच्या प्रारंभिक दरापासून कन्स्ट्रक्शन लोन देते. हे लोनदेखील 30 वर्षांसाठी असू शकते.
किती लोन मिळू शकतं?
कन्स्ट्रक्शन होमसाठी दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आ्हे. त्यात पहिली म्हणजे मालमत्तेचं मूल्य होय. तुम्ही ज्या जमिनीवर घर बांधत आहात, त्याच्या किमतीच्या 80 ते 90 टक्के लोन मिळतं; पण ईएमआय हा तुमच्या वेतनाच्या 40 ते 45 टक्के असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त ईएमआय बँक ग्राह्य धरत नाही. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या आधारे ईएमआय निश्चित केला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर होय. हा स्कोअर लोन मिळण्यासाठी चांगला असला पाहिजे.
