खुशबू यांना व्यवसाय करण्याची आवड आधीपासूनच होती. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे घरीच राहावे लागल्याने त्यांनी आपल्या आवडीचा उपयोग करून वेगवेगळ्या पॅनविच रेसिपी तयार करण्यास सुरुवात केली. या रेसिपी कुटुंबीय आणि मित्रमंडळींना खूप आवडल्या. त्यानंतर आपण हे व्यावसायिक पातळीवर का करू नये? असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी पहिल्यांदा औंध परिसरात छोटा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सुरुवातीला त्यांनी नोकरी आणि व्यवसाय दोन्ही सांभाळले. ऑफिस करून त्या रात्री दोन ते तीन तास औंधमध्ये पॅनविचचा स्टॉल लावत असत. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला. अनेक ग्राहक पुन्हा-पुन्हा येऊ लागले, ज्यामुळे आत्मविश्वास अधिक बळकट झाला. लोकांना आपला पदार्थ आवडतोय, आपण हे पुढे नेऊ शकतो, याची जाणीव झाल्यानंतर 2024 मध्ये त्यांनी पूर्णवेळ नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
यानंतर खुशबू यांनी पाषाण-सुस रोड परिसरात जेकेटीज पॅनविच नावाने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दोन ते तीन खास रेसिपी होत्या, ज्यामध्ये क्लासिक जेकेटी ही त्यांची सिग्नेचर रेसिपी ठरली. आज त्यांच्या व्यवसायात पाच वेगवेगळ्या प्रकारचे पॅनविच उपलब्ध आहेत. फ्ली मार्केट, विविध इव्हेंट्स आणि प्रदर्शनांमध्येही त्या स्टॉल लावत होत्या.
या संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे खुशबू सांगतात. व्यवसाय करताना अनेक चढ-उतार आले, अडचणीही आल्या, पण हार न मानता त्यांनी सातत्य ठेवले. कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे त्यांचे धाडस आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.