Christmas 2025 : चॉकलेट सांता अन् ख्रिसमस ट्री, फक्त 100 रुपयांपासून करा खरेदी, पुण्यात हे आहे ठिकाण, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नाताळ जवळ येताच शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढलेली पाहायला मिळते. गोड पदार्थ, केक, चॉकलेट आणि आकर्षक भेटवस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे.
पुणे : ख्रिसमस हा वर्षातील शेवटचा आणि आनंदाचा सण मानला जातो. ख्रिस्ती बांधवांसोबतच इतर धर्मीयही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. नाताळ जवळ येताच शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढलेली पाहायला मिळते. गोड पदार्थ, केक, चॉकलेट आणि आकर्षक भेटवस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. पुण्यातील सोमवार पेठ येथील 88 वर्षांची जुनी मूर्तीज बेकरी यंदाही नाताळच्या विशेष तयारीमुळे चर्चेत आहे.
मूर्तीज बेकरी ही गेली अनेक दशके नाताळसाठी खास पदार्थ तयार करत असून विशेषतः चॉकलेटचे सांता क्लॉज आणि चॉकलेट स्नो ट्री हे येथे खास आकर्षण ठरत आहेत. लहान मुलांसाठी खास तयार करण्यात आलेले चॉकलेट सांता, ख्रिसमस ट्री, स्नो मॅन, बेल्स यांसारखे हॅन्डक्राफ्टेड चॉकलेट पदार्थ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय चॉकलेट बुके, रम चॉकलेट बॉल, मर्जीपान चॉकलेट यांचीही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
advertisement
ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सण असल्याने ख्रिस्ती कुटुंबांमध्ये विविध पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यासाठी मूर्तीज बेकरीमध्ये दरवर्षीप्रमाणे स्टीम प्लम पुडिंग, व्हेज प्लम केक, अंड्याचा प्लम केक, प्लेन केक, फ्रुट केक, चॉकलेट ऑलनट केक असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यासोबतच ख्रिसमस स्वीट्समध्ये गोवा चीज, ओली करंजी, कलकलं यांसारखे पारंपरिक पदार्थही मिळत असून हे पदार्थ घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास घेतले जात आहेत.
advertisement
विशेष म्हणजे या सर्व पदार्थांचे दर 100 रुपयांपासून उपलब्ध असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नाताळचा उत्साह जाणवू लागतो आणि शेवटच्या आठवड्यात तर बेकरीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी दिसते.
याबाबत माहिती देताना विक्रम मूर्ती यांनी सांगितले की, ख्रिसमस हा आनंद आणि प्रेमाचा सण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नाताळसाठी खास चॉकलेट आणि केक तयार करत आहोत. यंदाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये नाताळचा उत्साह पाहायला मिळतो. नाताळच्या या गोड आणि आनंदी वातावरणात मूर्तीज बेकरी पुणेकरांसाठी पुन्हा एकदा खास आकर्षण ठरत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 2:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Christmas 2025 : चॉकलेट सांता अन् ख्रिसमस ट्री, फक्त 100 रुपयांपासून करा खरेदी, पुण्यात हे आहे ठिकाण, Video









