नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या पाच वर्षांपासून आपल्या ८४ वर्षीय पतीच्या मानसिक आजारावर उपचार करत आहेत, पण त्यांना काही फरक पडत नव्हता. याच दरम्यान, त्यांनी यूट्यूबवर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडिओ पाहिले. शास्त्री यांना भेटण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं संपर्क शोधायला सुरुवात केली. त्यांनी ऑनलाईन वेबसाईट सर्च केली आणि तिथे जाऊन त्यांना भेटण्यासाठी बुकिंग केलं. पती बरा व्हावा म्हणून त्यांनी पावती फाडली. ज्यामुळे पतीला आराम मिळेल असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी १६ सप्टेंबर रोजी 'बागेश्वर धाम' नावाने एक वेबसाइट शोधली आणि त्यावर दिलेल्या नंबरवर दोन-तीन वेळा कॉल केला, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
advertisement
आशिष शर्माचा फोन आणि फसवणुकीची सुरुवात
दोन दिवसांनी, म्हणजे १८ सप्टेंबर रोजी या महिलेला एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. त्याचे नाव आशिष शर्मा होते आणि त्याने दावा केला की तो बागेश्वर धाममधून बोलत आहे. शर्माने महिलेला सांगितले की, बाबा तुमच्या पतीसाठी 'पावती' फाडायची आहे, पण त्यासाठी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. पतीच्या काळजीने त्रस्त असलेल्या महिलेने त्याला सांगितले की, "माझ्याकडे सध्या फक्त 1 लाख रुपये आहेत, बाकीचे पैसे मी जमा करून देते." शर्माने लगेच यास सहमती दर्शवली. महिलेने तातडीने सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलाला फोन केला आणि त्याच्याकडून १ लाख रुपये मागवून घेतले. त्यानंतर त्यांनी आशिष शर्माच्या खात्यात टप्प्याटप्प्याने एकूण २.५५ लाख रुपये जमा केले.
घराबाहेरच्या व्यक्तीमुळे सत्य आले समोर
पैसे भरूनही काही दिवस बागेश्वर धामकडून कोणताही कॉल आला नाही, तेव्हा महिलेला काळजी वाटू लागली. दरम्यान, काही कामासाठी महिलेची मुलगी मुंबईत घरी आली. तेव्हा तिला या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली. आईला अशा पद्धतीने फसवण्यात आल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला. हा सायबर फ्रॉड असल्याचे समजताच मुलीने तातडीने सायबर हेल्पलाइन नंबर १९३० वर तक्रार नोंदवली.
तुमच्यासोबतही घडू शकतो भयंकर प्रकार
मुंबईतील विलेपार्ले इथे राहणाऱ्या या महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. अशा पद्धतीनं ऑनलाईन वेबसाइटवर विश्वास ठेवून कोणतेही काम करण्याआधी विचार करा. नाहीतर तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. या तक्रारीची चौकशी करण्याची जबाबदारी विलेपार्ले पोलिसांना सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने महिलेचे बँक खाते गोठवले असून, आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
