भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात धर्मापुरी या गावातील पौर्णिमा विलास राहुले यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, आमच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यात आम्ही भाजीपाला उत्पादन घेत होतो. त्याचबरोबर 2007 पासून आम्ही लाख उत्पादन घ्यायला सुरुवात केली. मी आणि माझे पती मिळून शेतीचे काम पार पाडत होतो. सर्व सुरळीत चालू असताना 2019 मध्ये माझ्या पतीचे निधन झाले. तेव्हा माझ्याकडे फक्त ती शेती होती आणि माझ्या दोन मुली. माझ्या मुलींसाठी आता मलाच उभं राहावं लागेल, असा विचार करत मी लाख व्यवसाय पुढे सुरूच ठेवला.
advertisement
लाख उत्पादन कसे घेतले जाते?
पौर्णिमा पुढे सांगतात की, पळस, बोर, आकाशमणी, पिंपळ या सर्व झाडांचा लाख उत्पादनात उपयोग होतो. भंडारा जिल्ह्यांत पळस जास्त असल्याने मी यात फक्त पळस असा उल्लेख केलाय. या चारही झाडांच्या माध्यमातून लाख उत्पादन घेता येऊ शकतं. त्याचबरोबर लाख म्हणजे काय? तर लाखेच्या मादी किडींपासून प्रजननानंतर स्त्रावाच्या स्वरूपात तयार होणाऱ्या पदार्थाला लाख असे संबोधले जाते. हे उत्पादन वर्षभर घेता येत नाही. कार्तिक महिन्यात लाखेच्या उत्पादनाला सुरुवात होते. तेव्हापासून 1 ते 2 महिन्यांच्या जवळपास हा हंगाम असतो. त्यानंतर हे उत्पादन घेता येत नाही. कार्तिक महिन्यात पळसाच्या झाडाला लाख आढळते. त्यानंतर त्या पळसाच्या फांद्या छाटाव्या लागतात. त्या फांद्या गोळा करून मजुरांच्या हाताने त्याचा लाख काढून घ्यावा लागतो. त्यासाठी चाकू किंवा विळ्याचा वापर केला जातो.
लाख उत्पादनात किती नफा मिळतो?
साधारण 1 क्विंटल लाख काढण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागतात. दीड ते दोन महिन्यांच्या हंगामात पाच ते सात क्विंटल लाखेचे उत्पादन आम्हाला मिळते. 1 क्विंटल लाखेचे 50 हजार रुपये मिळतात. त्यातून 10 हजार रुपये मजुरी दिली तरी पण आमच्याकडे 40 हजार रुपये शिल्लक राहते. या दोन महिन्यात आम्हाला तीन ते साडेतीन लाख रुपये नफा या लाख उत्पादनातून होतो. कच्ची लाख ही गोंदिया येथील बाजारपेठेत विकली जाते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केल्यानंतर तयार झालेल्या लाखेचा उपयोग दागिने बनविण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर औषध आणि अशाच अनेक गोष्टींमध्ये केला जातो.