मेहली मिस्त्री हे रतन टाटा यांचे निकटवर्तीय आणि टाटा ट्रस्टचे पर्मनंट ट्रस्ट्री आहेत. मेहली मिस्त्री हे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत. असं म्हटलं जातं की, सुमारे 2000 या वर्षापासून ते रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. टाटा ट्रस्टशी संबंधित सर्व कामाच्या जबाबदाऱ्या ते पार पाडतात. याशिवाय 2022 मध्ये त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देऊन त्यांचा सर रतन टाटा ट्रस्ट आणि दोराबजी टाटा ट्रस्टच्या बोर्डात समावेश करण्यात आला होता.
advertisement
रतन टाटांकडे ही शस्त्रं कशी आली होती?
माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही तिन्ही शस्त्रं रतन टाटा यांना भेट म्हणून मिळाली होती. त्यापैकी एक सुमंत मुळगावकर यांनी टाटांना दिली होती. 1988 मध्ये रतन टाटा उत्तराधिकारी होण्यापूर्वी सुमंत हे टाटा मोटर्सचे अध्यक्ष होते. सुमंत यांना शिकारीची खूप आवड होती. तेव्हा भारतामध्ये वन्यजीव संरक्षण नियम लागू झालेले नव्हते. इतर दोन शस्त्रं टाटांना वारसाहक्काने मिळाली होती. त्यापैकी शस्त्र वडील नवल टाटा यांचं होतं तर दुसरं शस्त्र जेआरडी टाटा यांचं होतं. देशातील सर्वांत जुन्या बंदूक परवानाधारकांमध्ये टाटांचा समावेश होतो. मात्र, त्यांनी त्याचा कधीही वापर केला नव्हता.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्याकडील शस्त्रं पोलिसांच्या शस्त्रागाराकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. ही शस्त्रं परत मिळवण्यासाठी मेहली मिस्त्री यांना स्व-संरक्षण, क्रीडा उपक्रम किंवा सजावटीच्या उद्देशाने वापर करण्याचा हवाला देऊन पुन्हा परवाना घ्यावा लागेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर मिस्त्रींकडे आणखी शस्त्रं असतील तर ते त्यांच्या सध्याच्या परवान्याखाली देखील या तिन्ही शस्त्रांची नोंदणी करू शकतात. मिस्त्री डेकोरेटिव्ह कॅटेगरीची निवड करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी असं केल्यास, पोलीस या तिन्ही शस्त्रांची फायरिंग पिन निष्क्रिय करतील. जेणेकरून शस्त्रांमधून दारूगोळा सोडता येणार नाही.
या शस्त्रांशिवाय अलिबागमधील बीचवरील एक मालमत्ताही मिस्त्री यांच्या नावे करण्यात आली आहे. जेव्हा टाटा मुंबईतील कुलाबा येथे बख्तावर या निवासी इमारतीत राहत होते, तेव्हा त्यांनी अलिबागमधील मालमत्ता खरेदी केली होती. 2012 मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर टाटा कुलाब्यातील तीन मजली घरात राहायला गेले होते.