जे कुणाच्या ध्यानी मनी नव्हतं ते अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं,३० गुंठ्यात ९ लाखांची केली कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Farmer Success Story : शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे, शेतीतून फक्त गुजराण होते आर्थिक प्रगती करणे कठीण आहे. अशी धारणा अनेकांच्या मनात आजही आहे.
मुंबई : शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे, शेतीतून फक्त गुजराण होते आर्थिक प्रगती करणे कठीण आहे. अशी धारणा अनेकांच्या मनात आजही आहे. हवामानातील अनिश्चितता, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढते उत्पादनखर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि धाडसी निर्णयांच्या जोरावर शेतीतून चांगला नफा कमावत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ओगदी गावातील शेतकरी मनोज गोणटे यांनी अशाच प्रयोगशील शेतीतून उल्लेखनीय यश मिळवले आहे. अवघ्या ३० गुंठे जमिनीत त्यांनी आल्याची लागवड करून १४ महिन्यांत तब्बल साडेचार लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची तालुकाभर चर्चा सुरू आहे.
पारंपरिक शेतीतून आधुनिक पिकांकडे वळण
मनोज गोणटे यांच्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित शेती आहे. पूर्वी त्यांच्या शेतात सोयाबीन, मका, तूर यांसारखी पारंपरिक पिके घेतली जात होती. मात्र वाढता खर्च आणि तुलनेने कमी उत्पन्न यामुळे अपेक्षित आर्थिक फायदा होत नव्हता. उत्पादन खर्च, मजुरी, खते आणि औषधे यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
बाजारपेठेचा अभ्यास, इतर प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव आणि शेती तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी आल्याची लागवड करण्याचे ठरवले. सुरुवातीला हा निर्णय धाडसी होता, कारण आले हे भाजीपाला वर्गातील नगदी पीक असून त्यात गुंतवणूक तुलनेने जास्त असते.
नियोजनबद्ध लागवड आणि व्यवस्थापन
मनोज यांनी ३० गुंठे क्षेत्रात आठ क्विंटल माहीम जातीचे बियाणे लावले. लागवडीनंतर त्यांनी शेणखत, बेसल डोस आणि जैविक औषधांचा योग्य वापर केला. पाण्याचे नियोजन, वेळोवेळी तणनियंत्रण आणि रोग व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिले.
advertisement
या संपूर्ण पिकासाठी त्यांना सुमारे साडेचार लाख रुपयांचा खर्च आला. मात्र त्यांनी उत्पादन आणि बाजारपेठेचा विचार करूनच गुंतवणूक केली होती. मेहनतीचे फळ म्हणून त्यांना तब्बल २८० क्विंटल आल्याचे उत्पादन मिळाले.
बाजारपेठेतील चढ-उतार आणि संयम
१४ महिन्यांनंतर पीक तयार झाले, मात्र त्या वेळी बाजारात आल्याचे दर घसरले होते. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी घाईत माल विकतात आणि तोटा सहन करतात. पण मनोज यांनी संयम दाखवला. त्यांनी आले साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि योग्य दराची प्रतीक्षा केली.
advertisement
काही महिन्यांनी बाजारभाव वाढले आणि त्यांना प्रति किलो ४० रुपये दर मिळाला. यामुळे त्यांना एकूण नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा केल्यानंतर ३० गुंठ्यातून साडेचार लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हाती आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 7:21 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
जे कुणाच्या ध्यानी मनी नव्हतं ते अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं,३० गुंठ्यात ९ लाखांची केली कमाई









