Bharat Bandh Today: आज भारत बंदची हाक! ३० कोटी कामगार संपावर, बँकेपासून ते वाहतुकीपर्यंत पाहा काय सुरू, काय बंद?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Bharat Bandh Today: देशभरातील प्रमुख कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरुद्ध आपला रोष व्यक्त करण्यासाठी हा देशव्यापी संप पुकारला आहे.
Bharat Bandh Today: तुम्ही जर आज कामासाठी बाहेर पडत असाल बँकेत जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज भारत बंदमुळे तुमची कामं अपूर्ण राहण्याची तुमची खेप फुकट जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी काय सुरू काय बंद राहणार ते आधीच चेक करा. देशभरातील प्रमुख कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरुद्ध आपला रोष व्यक्त करण्यासाठी हा देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपात ३० कोटींहून अधिक कामगार सहभागी होतील, असा दावा आयोजक संघटनांनी केला आहे.
भारत बंदचं कारण काय?
हा भारत बंद प्रामुख्याने १० केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने पुकारला आहे, ज्यामध्ये AITUC, INTUC आणि CITU यांसारख्या मोठ्या संघटनांचा समावेश आहे. या संघटनांना संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि इतर अनेक सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे.
सरकारच्या नवीन कामगार संहिता, ज्या कामगारांच्या नोकरीची सुरक्षा कमी करतात आणि मालकांना सोयीच्या ठरतात, असा या संघटनांचा आरोप आहे. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि नवीन शिक्षण धोरण रद्द करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
advertisement
शेतकरी संघटनांकडूनही बंदची हाक
शेतकरी संघटनांनी देखील या संपात उडी घेतली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करारावर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या करारामुळे अमेरिकेतील स्वस्त कृषी उत्पादने भारतीय बाजारपेठेत येतील आणि त्याचा थेट फटका भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासोबतच मनरेगा योजनेचे बजेट वाढवून ग्रामीण भागात रोजगाराची हमी मिळावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
advertisement
काय सुरू राहणार आणि काय बंद?
आजच्या या बंदचा सर्वाधिक फटका बँकिंग आणि विमा क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. सरकारी बँकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सामील झाल्याने व्यवहार ठप्प होऊ शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आणि सरकारी कार्यालये बंद राहतील.
अनेक राज्यांमध्ये एसटी बस सेवा आणि मालवाहतूक विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, सामान्यांच्या सुविधेसाठी काही अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळल्या आहेत. रुग्णालये, औषधांची दुकाने, रुग्णवाहिका, रेल्वे आणि मेट्रो सेवा, शाळा आणि कॉलेज पूर्ववत सुरू राहतील. तसेच रेल्वे वाहतूक आणि खाजगी कार्यालयांवर याचा फारसा परिणाम होणार नाही.
advertisement
प्रशासनाकडून इशारा
देशभरातील साधारण ६०० जिल्ह्यांमध्ये या संपाचा प्रभाव दिसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतः संवेदनशील भागात पोलीस दलाचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीनुसारच प्रवासाचे नियोजन करावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 7:47 AM IST
मराठी बातम्या/देश/
Bharat Bandh Today: आज भारत बंदची हाक! ३० कोटी कामगार संपावर, बँकेपासून ते वाहतुकीपर्यंत पाहा काय सुरू, काय बंद?








