कोडिंगपासून ते क्राफ्टिंगपर्यंतचा प्रवास..
सुष्मिता यांनी सांगितलं की, 2020 साली त्यांनी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) पुणे येथून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. लहानांपासून समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी नोकरी करण्याचा विचार न करता समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. त्यातूनच गुल्लकारी या व्यवसायाचा जन्म झाला. त्यांचे स्वतःचे शिक्षण सॉफ्टवेअर क्षेत्रातून झाले असल्याने त्यांनी गुल्लकारी नावाचे एक प्लॅटफॉर्म निर्माण केले आहे. या प्लॅटफॉर्मवर देशभरातील कारागीर आपल्या वस्तू विकू शकतात. या प्लॅटफॉर्ममुळे देशभरातील अनेक कारागिरांच्या हाताला रोजगार मिळाला असून, ते स्वतः तयार केलेल्या वस्तू थेट येथे विकू शकतात.
advertisement
गुल्लकारी व्यवसायाचा प्रवास..
सुष्मिता यांनी सांगितले की, त्यांनी 2021 साली सुरुवातीला गुल्लक नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला होता. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देणगीदारांकडून थोडेथोडे पैसे जमा करून ते सामाजिक कामासाठी वापरले जात होते. मात्र काही काळानंतर लोकांना दान देण्यापेक्षा त्यांना आत्मनिर्भर बनवणे अधिक गरजेचे असल्याचे सुष्मिता यांच्या लक्षात आले. यासाठी नेमके काय करता येईल, याचा अभ्यास करत त्यांनी देशभरात जवळपास 10 हजार किलोमीटरचा प्रवास केला.
या प्रवासातून त्यांना कारागिरांचा संघर्ष, त्यांच्या अडचणी आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यातील समस्या समजल्या. याच अनुभवातून गुल्लकारी हा प्लॅटफॉर्म उभा राहिला. या ठिकाणी कारागीर थेट ग्राहकांशी जोडले जात असून त्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. 2023 साली गुल्लकारीची सुरुवात करण्यात आली. पारंपरिक कलेला सन्मान आणि ओळख मिळवून देणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
गुल्लकारी सध्या 13 हून अधिक लोप पावण्याच्या मार्गावर असलेल्या पारंपरिक कलांना जतन करण्याचे काम करत आहे. या प्रत्येक कलेचा स्वतंत्र इतिहास असून त्याला मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वारली चित्रकला, बंगाल आणि ओडिशाची पटचित्र कला, मध्य प्रदेशची गोंड पेंटिंग, कर्नाटकाची चित्तारा कला, तेलंगणातील नायकपोड मास्क तसेच आंध्र प्रदेशची थोलू बोम्मलाटा अशा विविध पारंपरिक कलांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून या कलांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न गुल्लकारीकडून केला जात आहे.