उद्धव आणि दीपेश हे दोघे एकाच शाळेत शिकले आणि एकत्रच क्रिकेट खेळत मोठे झाले. क्रिकेटची आवड असूनही करिअर करता आले नाही, परंतु हे स्वप्न त्यांनी मनात जपून ठेवलेच. लॉकडाऊनच्या काळात दोघांची पुन्हा भेट झाली आणि तेथून या व्यवसायाच्या सुरुवातीची खरी बीजं रुजली.
10 गायीपासून केली सुरूवात, दुग्ध व्यवसायानं नशीबचं पालटलं, वर्षाला 90 लाखांची उलाढाल
advertisement
उद्धव तावरेचं शिक्षण दहावीपर्यंत झालं असून त्याचे आई-वडील लहानपणीच गेल्यामुळे त्याने पुढे क्रिकेटसंबंधित नोकरी करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे दीपेश गुजर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असला तरी त्यालाही क्रिकेटविषयी तेवढीच आवड होती.
लॉकडाऊनमध्ये सर्वकाही बंद झालेलं असताना दोघांची गाठ पडली. बोलता बोलता त्यांनी एकत्रच काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि क्रिकेट साहित्याच्या व्यवसायाकडे वळायचं पक्कं ठरवलं. त्याच काळात इंस्टाग्राम रील्सचा ट्रेंड सुरू होता. ही संधी ओळखत त्यांनी सोशल मीडियावर ऑनलाइन पद्धतीने क्रिकेट साहित्य विक्री सुरू केली.
दुकान नसल्यामुळे बॅट, बॉल, किटबॅगसारखे साहित्य त्यांनी घरातच ठेवले. अक्षरशः घरात बसायलाही जागा कमी पडायची. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आणि ग्राहकांना व्हिडिओ कॉलवर बॅट दाखवून त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रभर आणि नंतर देशभर ऑर्डर्स मिळवायला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांचा माल विदेशातही जाऊ लागला.
फक्त 50,000 रुपये गुंतवणुकीत सुरू झालेला यूडी स्पोर्ट्स पाच वर्षांत वेगाने वाढला. पुढे त्यांनी छोटा गाळा घेतला आणि आता स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिटही सुरू केले आहे. काश्मीरमधून मिळणाऱ्या दर्जेदार लाकडापासून बॅट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया उद्धव लक्षपूर्वक पाहतो, तर मार्केटिंग आणि नियोजनाचा भाग दीपेश सांभाळतो.
आज या दोघांचा वार्षिक व्यवसाय सुरुवातीच्या गुंतवणुकीपेक्षा पाच ते सात पट वाढला आहे. क्रिकेटमधील अपूर्ण स्वप्न त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून केवळ पूर्णच केले नाही, तर यूडी स्पोर्ट्स हे नावही देशाबाहेर पोहोचवलं आहे.