केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर 2025 रोजी रात्री वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या. आठ वर्ष जुनी जीएसटी व्यवस्था बदलून आता ती अधिक सोपी आणि परवडणारी करण्यात आली आहे. दोनच स्लॅब – 5 टक्के आणि 18 टक्के – लागू राहतील, तर 12 टक्के आणि 28 टक्के चे स्लॅब रद्द झाले आहेत. यामुळे वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम होणार आहे.
advertisement
वाहन क्षेत्रात दिलासा
छोट्या कार, स्कूटर आणि 350 सीसीपर्यंतच्या मोटरसायकलवर जीएसटी 28 टक्के वरून 18 टक्के करण्यात आला आहे. मोठ्या कारवर मात्र 40 टक्के जीएसटी कायम राहील. इलेक्ट्रिक गाड्यांवर आधीसारखाच 5 टक्के कर लागेल. या निर्णयामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात तेजी आली असून महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, हिरो मोटो आणि आयशर मोटर्ससारख्या कंपन्यांचे शेअर्स 8 टक्के पर्यंत वाढले.
मोबाईल फोनवर बदल नाही
मोबाईल फोनवर आधीसारखाच 18 टक्के जीएसटी लागणार आहे. ग्राहक आणि उद्योगाने कर 5 टक्के करावा अशी मागणी केली होती, मात्र ती मान्य झाली नाही. त्यामुळे मोबाईलच्या किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही.
दैनंदिन वापराच्या वस्तूंवर मोठा फायदा
साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम, आइसक्रीम, बटर, घी, चीज, डेअरी प्रॉडक्ट्स, बिस्किट, चॉकलेट, नमकीन, पास्ता, ड्राय फ्रूट्स, माल्ट, कॉर्नफ्लेक्स यांसारख्या वस्तूंवरील कर 18 टक्के वरून 5 टक्के करण्यात आला आहे. रोट्या, पराठे आणि UHT दूध आता पूर्णपणे करमुक्त झाले आहेत. यामुळे घरगुती खर्चात बचत होणार आहे.
हॉटेल उद्योगाला बळ
7500 रुपयांखालील हॉटेल रूमवर जीएसटी 12 टक्के वरून 5 टक्के करण्यात आला आहे. यामुळे पर्यटन आणि बजेट हॉटेल उद्योगाला चालना मिळेल. महसूल 7 ते 10 टक्के वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
विमा प्रीमियमवर सूट
आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीवर जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. त्यामुळे प्रीमियम भरणं स्वस्त होईल आणि अधिक लोक विमा घेण्याकडे वळतील.
तंबाखू उत्पादने महागच
पान मसाला, गुटखा, सिगारेट आणि तंबाखू उत्पादने यांच्यावर पूर्वीप्रमाणेच जास्त जीएसटी आणि कंपनसेशन सेस आकारला जाणार आहे. किमती ठरवताना आता ट्रांझॅक्शन व्हॅल्यूऐवजी रिटेल सेल प्राइस (RSP) हा आधार घेतला जाईल, ज्यामुळे नियम अधिक कडकपणे लागू होतील.
शेअर बाजारात उत्साह
या मोठ्या घोषणांचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसला. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी वाढून 81,000 च्या वर गेला, तर निफ्टी 24,780 अंकांवर पोहोचला. ऑटोमोबाईल, एफएमसीजी आणि हॉटेल उद्योगाशी संबंधित शेअर्समध्ये विशेष वाढ झाली आहे.
एकंदरीत या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चावर सकारात्मक परिणाम होईल, वाहन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळेल आणि उद्योगांना नवसंजीवनी मिळेल.