Pune Metro: पुणे मेट्रोला बाप्पा पावला! प्रवासी संख्येत तिपटीने वाढ, गणेशोत्सवात विक्रमी कमाई
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Metro: यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रोला पुणेकर व पिंपरी-चिंचवडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रवासी संख्या तिपटीने वाढली असून उत्पन्नातही मोठी भर पडलीये.
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध स्थानकांवरून तब्बल 6 लाख 91 हजार 583 प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला, यातून 1 कोटी 34 लाख 92 हजार 32 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात जाणे-येणे मेट्रोमुळे अधिक सोयीस्कर झाले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. याशिवाय मेट्रो प्रशासनाने रात्रभर सेवा उपलब्ध करून दिली होती, ज्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ भाविकांनी घेतला.
37 लाख प्रवासी, 5.67 कोटींचे उत्पन्न
यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रोला पुणेकर व पिंपरी-चिंचवडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या अकरा दिवसांत मेट्रोने तब्बल 37.16 लाख प्रवाशांना सेवा दिली, तर उत्पन्नाची आकडेवारी 5.67 कोटी रुपयांवर पोहोचली. उत्सव काळात करण्यात आलेल्या विशेष नियोजन आणि विस्तारित सेवेमुळे ही वाढ झाल्याचे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला.विशेष म्हणजे, 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान मेट्रो रात्री दोन वाजेपर्यंत धावली, तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी सलग 41 तास सेवा पुरवण्यात आली.
advertisement
प्रवासी संख्या तिपटीने वाढली, उत्पन्नातही मोठी भर
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांची संख्या तब्बल 300 टक्क्यांनी वाढली, तर उत्पन्नातही मोठी भर पडली. गर्दी हाताळण्यासाठी मेट्रो प्रशासनाने अतिरिक्त फेऱ्या, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि स्थानकांवरील सुविधा वाढवणे अशा उपाययोजना केल्या.विशेष म्हणजे, रात्री उशिरा प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी मेट्रोने पीएमपी बससेवा आणि ऑटोरिक्षा चालकांशी समन्वय साधला. त्यामुळे भाविकांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित झाला.
advertisement
गणेशोत्सवात मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळाला. भाविकांच्या सोयीसाठी आम्ही 20 तास सेवा दिली आणि अनंत चतुर्दशीला तब्बल 41 तास सलग सेवा पुरवली. यंदा पिंपरी-चिंचवडमधून पुणे शहराच्या मध्यभागी जाणे सुलभ झाले. त्यामुळे प्रवाशांना वाहतुकीच्या त्रासापासून मुक्ती मिळाली, असे अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) महामेट्रोचे चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 09, 2025 8:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुणे मेट्रोला बाप्पा पावला! प्रवासी संख्येत तिपटीने वाढ, गणेशोत्सवात विक्रमी कमाई