Weather Alert: स्वेटर अन् रेनकोट सोबत ठेवा, महाराष्ट्रात वारं फिरल, ऐन थंडीत पावसाचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: मकर संक्रांतीच्या आधीच राज्यावर अवकाळी संकट घोंघावत आहे. कुठं कडाक्याची थंडी, तर कुठं पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ऐन थंडीच्या दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचे चित्र आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. सोमवारी पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापुरात जोरदार पावसाने हजेरी लावली, तर मुंबई आणि पुण्यातही हवामानाचा मूड बदललेला दिसून आला. आज, 13 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात हवामान कसं असणार आहे, ते पाहूया.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हवामान तुलनेने स्थिर राहणार आहे. या भागांत सकाळी आणि रात्री थंड वातावरण जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत तापमान वाढल्याने उकाडा त्रासदायक ठरेल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता जवळपास नाही. कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान, तर किमान तापमान 18 ते 22 अंशांच्या आसपास राहील. पहाटे काही भागांत हलकं धुके दिसून येऊ शकतं, मात्र दिवसभर हवामान कोरडं आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात सोमवारपासून ढगाळ वातावरणाचं वर्चस्व दिसून येत आहे. कोल्हापूर शहरासह परिसरात संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. ऐन थंडीच्या दिवसांत पावसामुळे वेगळंच चित्र निर्माण झालं आहे. या हवामान बदलाचा परिणाम पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या काही भागांतही जाणवला असून या जिल्ह्यांत ढगाळ आकाश आणि गारवा कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत आकाश अंशतः ढगाळ राहू शकतं.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांत मात्र थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेडसह नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांत सकाळी दाट धुके आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव राहील. या भागांत किमान तापमान 8 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते, तर कमाल तापमान 27 ते 31 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांत गारठा अधिक तीव्र जाणवू शकतो आणि पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवायला मिळू शकते.
advertisement
एकंदरीत पाहता, आज राज्यात पावसाची शक्यता मर्यादित असली तरी ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यांमुळे हवामानात चढ-उतार कायम राहणार आहेत. मुंबई–कोकणात सौम्य थंडी आणि दमट हवा, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात सकाळची थंडी आणि काही ठिकाणी हलक्या सरी, तर मराठवाडा आणि विदर्भात कडाक्याची थंडी अशी स्थिती राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला तरी पहाटे आणि रात्रीचा गारवा कायम राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










