Ulhasnagar Elections : प्रचार संपताच 'लक्ष्मी दर्शन' सुरू, उल्हासनगरमध्ये सापडली पैशांनी भरलेली बॅग!
- Reported by:GANESH GAIKWAD
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
उल्हासनगरमध्ये पैशाने भरलेली लाखो रुपयांची बॅग पकडण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पैशांनी भरलेली ही बॅग सापडल्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे.
उल्हासनगर : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत, यानंतर आता निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. उल्हासनगरमध्ये पैशाने भरलेली लाखो रुपयांची बॅग पकडण्यात आली आहे. रिक्षामधून एका बॅगमध्ये भरून लाखो रुपये आणले जात होते. अपक्ष उमेदवाराने हे पैसे पकडल्यानंतर उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात मोठा गोंधळ झाला आहे.
उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागात एका रिक्षेतून बॅग भरून हे पैसे काही अज्ञात घेऊन चालले होते, त्यावेळी अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षेचा पाठलाग केला आणि ही रिक्षा थांबवली. या रिक्षामध्ये पैशांनी भरलेली बॅग आढळून आली. यानंतर रिक्षातील अज्ञात तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं. या प्रकारानंतर पोलीस चौकीसमोर गर्दी झाली आणि मोठा राडा झाला.
advertisement
भाजप उमेदवारांसाठी हे पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी पैसे घेऊन आलेल्या तरुणांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू झाली आहे.
नालासोपाऱ्यातही कारवाई
दरम्यान नालासोपारा पूर्व भागातील पेल्हार येथे पैसे पकडण्यात आले आहेत. हे पैसे भाजपचे असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे, पण भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. बहुजन विकास आघाडीचा हा स्टंट असल्याची प्रतिक्रिया भाजप उमेदवार मनोज पाटील यांनी केली आहे.
advertisement
वॉशिंग मशीन जप्त
पिंपरी-चिंचवडमध्ये भरारी पथकाने 19 वॉशिंग मशिन जप्त केली आहेत. रहाटणी इथल्या गणराज कॉलनी भागात भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. रहाटणी येथील गणराज कॉलनीमध्ये मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केलं जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती, त्यानंतर 12 जानेवारीला रात्री 10.23 च्या सुमारास भरारी पथकाने 19 वॉशिंग मशिन जप्त केली.
advertisement
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या मतदानाआधी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर लगेचच 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
Location :
Ulhasnagar,Thane,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 6:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ulhasnagar Elections : प्रचार संपताच 'लक्ष्मी दर्शन' सुरू, उल्हासनगरमध्ये सापडली पैशांनी भरलेली बॅग!








