राजस्थानच्या कोटपूतली येथील अमित सेहरा या तरुणाने अक्षरशः नशिबाची लॉटरी मारली आहे. त्याने केवळ 1,000 रुपये उधार घेऊन दोन लॉटरी तिकिटं विकत घेतली होती आणि त्यापैकीच एका तिकिटाने त्याला तब्बल 11 कोटी रुपयांचा जॅकपॉट मिळवून दिला. ही बातमी सोशल मीडियावर काही तासांतच व्हायरल झाली आणि लोकांनी त्याच्या या अविश्वसनीय नशिबावर प्रतिक्रिया देत आहेत.
advertisement
भारतामध्ये लॉटरीच्या सर्व योजना “लॉटरी रेग्युलेशन अॅक्ट 1998” या कायद्यांतर्गत येतात. या कायद्यानुसार लॉटरी म्हणजे अशी योजना जिथे सहभागी लोक ठरावीक किंमतीचे तिकिट खरेदी करून बक्षीस जिंकण्याची संधी मिळवतात. या योजनेत अनेक लोकांचा सहभाग असावा लागतो आणि तिकिटांची खरेदी-विक्री ही अधिकृत परवानगी असलेल्या माध्यमातूनच केली जाते. सर्व लॉटरी ड्रॉ हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली घेतले जातात आणि एका आठवड्यात फक्त एकच ड्रॉ घेण्याची परवानगी असते.
मात्र लॉटरी जिंकल्यानंतर मूळ तिकिट हरवल्यास, विजेत्याला बक्षीसाचा दावा करता येत नाही. फक्त तिकिटाचा फोटो किंवा प्रत दाखवूनही पारितोषिक मिळत नाही. मूळ तिकिटासोबत ओळखपत्र (ID Proof) सादर करणं अनिवार्य आहे. जर ठराविक वेळेत कोणी बक्षीसाचा दावा केला नाही, तर ती रक्कम राज्याच्या सार्वजनिक निधीत जमा केली जाते आणि ती सरकारची मालमत्ता बनते.
लॉटरीवरील कायद्यानुसार लॉटरी एका अंकावर आधारित किंवा आधीच ठरवलेल्या नंबरवर चालवली जाऊ शकत नाही. सर्व तिकिटांवर राज्य सरकारचं अधिकृत लोगो असणं आवश्यक आहे, जे त्याच्या प्रामाणिकतेची हमी देते. प्रत्येक राज्याला दरवर्षी जास्तीत जास्त सहा “बंपर ड्रॉ” घेण्याची परवानगी आहे. सर्व बक्षिसं ड्रॉ झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत वितरित केली जाणं बंधनकारक आहे आणि हे काम सरकारी बँका किंवा अधिकृत वितरकांमार्फतच केलं जातं.
या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे लॉटरी खेळताना किंवा बक्षीस जिंकल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींचं पालन करणे अत्यावश्यक आहे.
अमित सेहराने आपल्या नशिबावर विश्वास ठेवला आणि छोट्या गुंतवणुकीतून मोठं स्वप्न पूर्ण केलं. लॉटरी जिंकणं ही गोष्ट लकवर अवलंबून असली तरी त्याचे नियम समजून घेणं आणि मूळ तिकिट जपणं हे देखील तितके महत्त्वाचे आहे.
