मुंबईची लाईफलाईन धावणार विद्यार्थ्यांसाठी
परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबईसह राज्यभरात अतिरिक्त बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 दरम्यान तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी हे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
विभागीय आणि आगार व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून एखाद्या विशिष्ट मार्गावर विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून मागणी आल्यास तात्काळ जादा बस उपलब्ध करून देण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार बस फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
गर्दी नियंत्रणासाठी प्रमुख बस स्थानकांवर निरीक्षकांची नियुक्ती
विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना होणारी धावपळ टाळण्यासाठी त्यांना पुढील दारातून प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे. तसेच बसचालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागावे आणि प्रवासादरम्यान पूर्ण सहकार्य करावे अशा कडक सुचना बेस्ट प्रशासनाने दिल्या आहेत. गर्दी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या बस स्थानकांवर निरीक्षक आणि अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात येणार आहे.
