पालघर: पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली सापडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये बोईसर-खानिवडे मार्गावर संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. शरद घाटाल (वय वर्ष 30) आणि अनिकेत कामडी (वय वर्ष 18) अशी मृतांची नाव आहे. त्यांच्यासोबत निराज कामडी हा तरुण जखमी झाला आहे. तिन्ही तरुण दुचाकीवरून कामावरून घरी परत येत होते, त्यावेळी हा अपघात घडला. तिघेही तरुण शिगाव रामपाडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
शरद घाटाल, अनिकेत कामडी आणि विराज कामडी हे तिन्ही तरुण एकाच ठिकाणी कामाला होते. नेहमीप्रमाणे संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर तिन्ही तरुण एकाच दुचाकीवर घरी येत होते. घरी येत असताना बोईसर-खानिवडे मार्गावर आले असता राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस जात होती. एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, पण अचानक चालकाचं दुचाकीवरच नियंत्रण सुटलं आणि दुचाकी एसटी बसला धडकून थेट बसच्या चाकाखाली गेली.
बसच्या चाकाखाली दुचाकी सापडल्यामुळे काही कळायच्या आत दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीवरील शरद घाटाल आणि अनिकेत कामडी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर विराज कामडी हा तरूण दूर फेकला गेला. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि तिन्ही तरुणांना बाहेर काढलं. विराज कामडीला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
