८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला असून, आज मुंबईच्या नव्या महापौरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा सलग दुसऱ्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार असून महापालिकेवर महिलाराज पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व बाजूने भाजपकडून प्रयत्न सुरू आहे.
शिवसेनेचा (शिंदे गट) उपमहापौर?
भाजपचा महापौर असला तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) उपमहापौरपद दिलं जाणार आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी शिंदे गटाने आपला उपमहापौरपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. संजय घाडी यांना संधी देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
किशोरी पेडणेकरांची 'उबाठा' गटनेतेपदी निवड
दुसरीकडे, शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. वॉर्ड क्रमांक १९९ मधून शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला. आता उबाठा गटाने त्यांची महापालिकेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. २२ नोव्हेंबर २०१९ ते ८ मार्च २०२२ या काळात त्या मुंबईच्या ७७ व्या महापौर होत्या. आता नव्या सभागृहात त्या आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसतील.
मुंबई महापालिकेचे अंतिम पक्षीय बलाबल
यंदाच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असली तरी त्रिशंकू अवस्था टाळण्यासाठी युतीचे समीकरण महत्त्वाचे ठरले आहे.
पक्ष,जागा
भाजप,८९
शिवसेना (ठाकरे गट),६५
शिवसेना (शिंदे गट),२९
काँग्रेस,२४
एमआयएम (MIM),०८
मनसे,०६
राष्ट्रवादी (अजित पवार),०३
समाजवादी पक्ष,०२
राष्ट्रवादी (शरद पवार),०१
गेली २५-३० वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. आता भाजपने ही सत्ता ताब्यात घेतल्यामुळे मुंबईच्या विकासकामांची दिशा आणि प्राधान्यक्रम बदलण्याची शक्यता आहे. रखडलेले प्रकल्प, कोस्टल रोडचे पुढील टप्पे मेट्रो प्रकल्प याकडे लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने मुंबईच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय.
