उपमहापौरपदी शिंदे गटाचे संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जर विरोधीपक्षांनी उमेदवारी अर्ज भरला नाही तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उपमहापौरपदाच्या वाटाघाटी सुरू असताना यावेळी फक्त सव्वा वर्षांसाठीचा महापौर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतरची सूत्र काय असतील हे मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
advertisement
संजय घाडी यांची प्रतिक्रिया
मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय घाडी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे पद केवळ सव्वा वर्षासाठीनिश्चित करण्यात आले असून, त्यामागे पक्षातील सर्वच नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना कामाची संधी मिळावी, असा महत्त्वाचा संदेश पक्षाने दिला आहे. आगामी काळात पक्षांतर्गत बदलांचे संकेत देताना, महापालिकेत नवनवीन चेहरे आणि नेतृत्व समोर येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुंबईच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. उबाठा गटाने या पदासाठी आपला अर्ज भरायचा की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे घाडी यांनी म्हटले आहे. मात्र, जर विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज दाखल झाला नाही, तर ही निवडणूक बिनविरोध पार पडेल आणि मुंबईच्या राजकारणात एक नवा पायंडा पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अमित साटम काय म्हणाले?
उपमहापौरपदासाठी सव्वा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. आता महापौरपदाचाही असाच फॉर्म्युला राहणार की एकच नाव सलग ठेवलं जाणार याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी एक शब्दात उत्तर देऊन विषय संपवला आहे. त्यांनी यावर जास्त बोलणं टाळलं. यावर बोलू नंतर म्हणत एक शब्दांत विषय संपवला आहे. अमित साटम यांचे मोठे विधान सव्वा वर्ष फॅार्मुला हा भाजपचा नाही हा केवळ शिवसेचा अंतर्गत फॅार्म्युला आहे. वेगवेगळ्या लोकांना टप्प्याटप्प्याने ही जबाबदारी देण्यात येणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजप आपला एकच महापौर ठेवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सव्वा वर्षांनंतर पुढे काय?
शिंदे गटाकडून सव्वा वर्ष उपमहापौर संपल्यानंतर पुढे काय असा प्रश्न आहे. शिंदे गटाकडून दुसरा उमेदवार दिला जाणार की उरलेली सव्वा वर्ष भाजप आपला उपमहापौर देणार याबाबत अजूनही शंका आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर शिंदे गटाकडून याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
