विधिमंडळामध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बससेवेची घोषणा फेब्रुवारी महिन्यातच केलेली होती. परिवहन मंत्र्यांनी या नव्या बससेवेची घोषणा केल्यानंतर लगेचच आता या बसेसचे उद्घाटन केले जाणार आहे. 'राजमाता जिजाऊ' या नव्या बसेसचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या अर्थात 24 मार्च रोजी विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या परिसरात उद्धाटन केले जाणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्हीही राज्यातील वरिष्ठ नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
advertisement
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 3,000 राजमाता जिजाऊ या स्मार्ट बस दाखल होणार आहेत. दोन शहरांदरम्यान चालणार्या या बस सर्वात आधी गर्दीच्या मार्गांवर धावणार आहेत. घोषणेच्या वेळी या बस मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत सुरू होतील अशी माहिती मिळाली होती. आता ही सेवा सर्वात पहिली नागपूरमध्ये सुरू होणार असून पहिल्यांदा 50 बस शहरात दाखल होतील. परिवहन मंत्र्यांच्या ह्या निर्णयामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होईल आणि प्रवासी सेवांमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बसमध्ये अत्याधुनिक सुविधा सुद्धा नागरिकांना पुरवल्या जाणार आहेत.
मुंबई ते प्रमुख शहरांदरम्यान, शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी यांसारख्या एसटी बसेस महामंडळाकडून चालवल्या जातात. परवडणाऱ्या दरामुळे प्रवाशांकडून एसटी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांकडून मोठी मागणी असते. नव्याने सुरू होणाऱ्या 'राजमाता जिजाऊ' बसमध्ये प्रवाशांना आराम आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. नव्या बसमध्ये 3 बाय 2ची आसन रचना असून एकूण 56 सीटांची क्षमता आहे. नव्या बसमध्ये साधारण बसेसपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करू शकतात. शिवाय या नव्या बसेस स्मार्ट बसेस असतील. यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्याच्या हेतूने ही सेवा सुरू करण्याचा मानस परिवहन मंत्र्यांचा आहे.
