धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रहिवासी असलेला अविनाश जाधव नुकताच कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या वर्दीत फिरताना दिसला. एएसआय दर्जाची एक स्टार असलेली फीत आणि पूर्ण आरपीएफचा युनिफॉर्म यात तो अतिशय नैसर्गिकरीत्या वावरत होता. मात्र कल्याणमध्ये असा अधिकारी पूर्वी दिसला नसल्याने स्थानकातील आरपीएफ जवानांच्या नजरेत त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यापैकी एका जवानाने त्याला थांबवून चौकशी केली असता तो प्रत्यक्षात आरपीएफ कर्मचारी नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
advertisement
जवानांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन जीआरपीकडे सोपवले. प्राथमिक चौकशीत त्याने आतापर्यंत कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्याने बनावट वर्दी का वापरली याचा तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पुढील चौकशी सुरू आहे. अविनाशचे शिक्षण FYBA पर्यंत झाले असून सध्या तो हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. तर, गावी त्याचे आई- वडील शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांना मुलगा पोलिस सेवेत असल्याचा समज होता. चौकशीत पुढे आले की अविनाशने ही आरपीएफची वर्दी अहिल्यानगर येथे खास बनवून घेतली होती.
खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण न झाल्याने 'अधिकारी' होण्याचा शॉर्टकट शोधणाऱ्या या तरुणाची कहाणी आता कायदेशीर कारवाईच्या चौकटीत पोहोचली आहे. पुढील तपासात यामागील मानसिकता आणि नक्की उद्देश यावर प्रकाश पडण्याची अपेक्षा आहे.
