नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथे राहणारे आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेले शैलेश संतोष (वय51) यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट 2025 पासून आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधत आर्थिक दबाव टाकण्यास सुरुवात केली.
मुन्नाफ अब्दुल रेहमान लाम्बे उर्फ बाबा खान (वय45) याने तक्रारदाराला गोरेगाव पूर्व येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. स्वतःची ओळख 'बाबा खान' अशी करून देत काही व्यक्तींची थकबाकी असल्याचा बनाव केला आणि पैसे देण्याची मागणी केली.
advertisement
तक्रारदाराने कोणतीही देणी नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आरोपीने गंभीर परिणामांची धमकी दिली. पोलिसांमध्ये स्वतःचा प्रभाव असल्याचा दावा करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भीतीपोटी तक्रारदाराने आरोपीच्या सांगण्यानुसार विविध मार्गांनी पैसे दिल्याचे नमूद आहे.
किती रक्कम उकळली?
14 ऑगस्ट 2025 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 57 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. सुमारे 6.25 लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे वर्ग करण्यात आले. अंदाजे 2.4 लाख रुपयांचे महागडे मोबाइल फोन आणि घड्याळे आरोपीने घेतल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांत मोठी रक्कम उकळण्यात आल्याने हा प्रकार अधिक गंभीर ठरला आहे. 11 फेब्रुवारी रोजी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीविरुद्ध यापूर्वीही 19 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी मेट्रोपॉलिटन न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
