मुंबई-तामिळनाडू प्रवाशांसाठी मोठा दिलासा
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 22629/22630 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुनेलवेली एक्स्प्रेसमध्ये कायमस्वरूपी सहा अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही गाडी पूर्वीच्या 16 डब्यांऐवजी तब्बल 22 डब्यांसह धावणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून वेटिंग यादीचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
नव्या रचनेनुसार गाडीत एक एसी द्वितीय श्रेणी, चार एसी तृतीय श्रेणी आणि एक स्लीपर कोचचा डबा वाढवला जाणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळेल. विशेषतहा उन्हाळी हंगामात दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
'हे' मोठे बदल कधीपासून होणार लागू?
गाडी क्रमांक 22629 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुनेलवेली एक्स्प्रेस 16 एप्रिलपासून सुधारित रचनेसह एलटीटीहून धावणार आहे. तर गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 15 एप्रिलपासून तिरुनेलवेली येथून नवीन डब्यांसह मार्गस्थ होईल. या बदलामुळे मुंबई आणि तामिळनाडू दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
