चिराग हरगुनानी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर वांद्रे पोलिसांनी २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास घडली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा पायधुनी परिसरात राहतो. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने मित्राच्या गाडीने तो रिझवी लेन परिसरात आला होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर उशीर झाल्याने तरुणाने चुलत भावाला फोन करून बँड स्टँड येथे बोलावून घेतले. पावणे चारच्या सुमारास तरुण भावासोबत स्कूटीने तेथून निघाला.
advertisement
दोघंही खोजा फ्लोरिस्ट या ठिकाणी पोहोचताच आरोपी चिराग त्याच्या आलिशान कारमधून तिथे आला. त्याने तरुणाला गुरुनानक पार्क कुठे आहे, असं विचारले. तरुणाने गुगल मॅपवरून त्याला गुरुनानक पार्कचा रस्ता दाखविला. मात्र चिरागने मला समजले नाही, रस्ता दाखवा, अशी विनंती केली. त्यामुळे तरुण गाडीत बसला होता.
प्रवासादरम्यान चिरागने तरुणाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गाडी गुरुनानक पार्कपर्यंत पोहोचली. चिरागने सुसाट गाडी नेल्याने तरुणाला संशय आला. त्याने तातडीने स्कूटीवरून येणाऱ्या भावाला फोन करून सांगितले. तरुण हा चिरागला सतत कार थांबवण्याची विनंती करत होता.
मात्र त्याने गाडी सुसाट पळवली. तरुणाने कसाबसा गाडीचा दरवाजा उघडला. तेव्हा चिरागने त्याला हाताने मारहाण केली आणि गाडीचा वेग अजूनच वाढवला. तरुणाने गाडीची चावी बंद केली आणि पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चालक चिराग हरगुनानी याला अटक केली आहे.
